नवनीत राणांना भाजपकडून ‘जय श्रीराम’ लिहिलेली 5000 पत्रं
"भारतातील बहुसंख्य नागरिकांचे श्रद्धास्थान श्रीराम आहेत, त्यांच्या उच्चाराने खासदार नवनीत राणा यांना कसला त्रास झाला?"
अमरावती : ‘जय श्रीराम’ या वाक्यावरुन देशात राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजप कार्यकर्त्यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना ‘जय श्रीराम’ लिहिलेली पाच हजार पोस्टकार्ड पाठवली आहेत. संपूर्ण जिल्ह्यत ही मोहीम राबविली जात असून, आज एकट्या दर्यापूर तालुक्यातून पाच हजार पत्र खासदार नवनीत राणा यांना पाठवण्यात आल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार नवनीत राणा यांनी संसदेमध्ये भाजप खासदारांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने आक्षेप घेतला होता. याप्रकरणी आता भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस अतुल गोळे आणि विनय गावंडे यांनी अभियान चालवण्याचे आवाहन केले आहे. खासदार नवनीत राणा यांना भाजयुमोकडून ‘जय श्रीराम’चा मजकूर लिहून खासदार नवनीत राणा यांना पत्र पाठवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
लोकसभेत ‘जय श्रीराम’च्या घोषणा देऊ नका, असं खासदार नवनीत राणा म्हणाल्या, अशा आशयाचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अमरावतीच्या दर्यापुरात मोठ्या प्रमाणात भाजप, भाजयुमो आणि इतर नागरिकांनी निषेध केला आहे. त्यानंतरच भाजप कार्यकर्त्यानी खासदार नवनीत राणा यांना ‘जय श्रीराम’ लिहिलेले 5000 पोस्ट कार्ड पाठवण्यात आले.
भारतातील बहुसंख्य नागरिकांचे श्रद्धास्थान श्रीराम आहेत, त्यांच्या उच्चाराने खासदार नवनीत राणा यांना कसला त्रास झाला? हे नवनीत राणांनी स्पष्ट करावं, असा सवाल भाजप कार्यकर्त्यांनी केला.
नवनीत राणा कोण आहेत?
अपक्ष आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा या सध्या अमरावती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत खासदार आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ यांचा नवनीत राणांनी यंदा लोकसभा निवडणुकीत पराभव केला.