‘उद्धव ठाकरे फक्त एवढं लक्षात ठेवा’, फडणवीस यांचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत सूचक इशारा
उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली टीका भाजपला चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यामुळे भाजप नेत्यांकडून उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. भाजपच्या अधिकृत एक्स अकाउंटवरुनही उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा तापताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईच्या रंगशारदा सभागृहात आपल्या पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. एकतर देवेंद्र फडणवीस राहतील नाहीतर मी राहीन, असं उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले. त्यांची ही टीका भाजप नेत्यांच्या जास्त जिव्हारी लागली आहे. भाजप नेत्यांकडून उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलं जात आहे. भाजपच्या मुंबई भाजप अधिकृत एक्स अकाउंटवर एक व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. या व्हिडीओत देवेंद्र फडणवीस बोलताना दिसत आहेत. या व्हिडीओसोबत उद्धव ठाकरे यांना उद्देशून एक कॅप्शन लिहिण्यात आलं आहे.
भाजपने नेमकं काय ट्विट केलं आहे?
‘उद्धव ठाकरे फक्त एवढं लक्षात ठेवा…’, असं कॅप्शन देत भाजपने व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत देवेंद्र फडणवीस मीडियाला बाईट देताना दिसत आहेत. संबंधित व्हिडीओ हा अवघ्या काही सेकंदाचा आहे. “माझा एक सिद्धांत पक्का आहे. मी कुणाच्या नादी लागत नाही, कुणी नादी लागलं तर सोडत नाही”, असं देवेंद्र फडणवीस या व्हिडीओत बोलताना दिसत आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा हा जुना व्हिडीओ आहे. पण हा व्हिडीओ उद्धव ठाकरेंना उद्देशून भाजपकडून शेअर करण्यात आला आहे. याचाच अर्थ देवेंद्र फडणवीस आता उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे. मग ते प्रत्युत्तर कसं असेल? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
उद्धव ठाकरे यांची नेमकी टीका काय?
“कालपर्यंत माझ्या घरामधील लोकं माझ्या घरावरच चाल करुन येत आहेत. अगदी अनिल देशमुख यांनी सांगितलं की, कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते. मी सगळं सहन करुन हिंमतीने उभा राहिलो आहे. एक तर तू तरी राहशील किंवा मी तरी राहीन”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती.
उद्धव ठाकरे फक्त एवढं लक्षात ठेवा…@OfficeofUT https://t.co/Uqgz3gYJTn pic.twitter.com/1p1vJAWovE
— BJP Mumbai (@BJP4Mumbai) July 31, 2024
प्रसाद लाड यांचं ठाकरेंना प्रत्युत्तर
भाजप आमदार प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. “उद्धव ठाकरेंनी वापरलेली भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि उद्धव ठाकरेंना वैयक्तिक शोभत नाही. महापालिकेतील भ्रष्टाचारातून मिळणारे पैसे बंद झाले म्हणून तुमचे मानसिक खच्चीकरण झाले, ते जनतेसमोर येत आहे”, अशी टीका आमदार प्रसाद लाड यांनी केली.