औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोडचे काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांना भाजपमध्ये घेण्यास विरोध होताना दिसतो आहे. भाजपचे सिल्लोडमधील पदाधिकाऱ्यांनी आमदार अब्दुल सत्तार यांना पक्षात घेण्यास जोरदार विरोध केला आहे.
काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांना भाजपमध्ये घेण्याबाबत भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा तीव्र विरोध आहे. भाजपचे सिल्लोड तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोटे आणि माजी आमदार सांडू पाटील लोखंडे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना आमदार अब्दुल सत्तार यांना भाजपमध्ये घेण्यास विरोध दर्शवला आहे.
अब्दुल सत्तार यांच्या भाजप प्रवेशाला विरोध करण्यासाठी आज सिल्लोड येथे बैठक आयोजित करण्यात आली.
अब्दुल सत्तार भाजपमध्ये प्रवेश करणार?
अब्दुल सत्तार हे काँग्रेसचे औरंगाबदमधील सिल्लोड मतदारसंघातील आमदार आहेत. मात्र, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून विधान परिषद आमदार सुभाष झाम्बड यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्यानंतर, अब्दुल सत्तार नाराज झाले आणि त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरु केल्या.
काही दिवसांपूर्वीच अब्दुल सत्तार यांनी जालन्यात जाऊन रावसाहेब दानवे यांचीही भेट घेतली. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत 10 आमदार भाजपमध्ये जाणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी जालन्यात सांगितले. या दहा आमदारांमध्ये अब्दुल सत्तार असण्याची दाट शक्यता आहे.
त्यातच गेल्या काही दिवसात अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसी यांच्यापासून गिरीश महाजन, रावसाहेब दानवे यांच्यापर्यंत राज्यातील भाजपच्या बहुतेक वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. त्यामुळे अब्दुल सत्तार यांचा भाजपप्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. मात्र, आता भाजपकडूनच अब्दुल सत्तार यांच्या भाजपप्रवेशाला विरोध होताना दिसत आहे.