उद्या ‘पितृपक्ष’ संपणार… उद्धव ठाकरेंच्या जिव्हारी लागणारी टीका कुणाची?
मनसे, भाजप आणि शिंदे गटाकडून त्यांना जोरदार आव्हान मिळणार हे निश्चित आहे. पण या सर्व टीकांना उद्धव ठाकरे कशा प्रकारे प्रत्युत्तर देतात, याकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागलंय.
मुंबईः उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्याईवर जगणारे बांडगुळं आहेत. ते कर्तव्यशून्य आहेत, अशी थेट टीका दोन दिवसांपूर्वी मनसेनं केली. त्यानंतर आता भाजपकडून उद्धव ठाकरेंकडे दिशानिर्देश करणारं याच प्रकारचं सूचक वक्तव्य आलंय. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी हे सूचक ट्विट केलंय. उद्या पितृपक्ष संपणार, असं वक्तव्य त्यांनी केलंय. हा इशारा उद्धव ठाकरे आणि शिवसेनेकडे असल्याची जोरदार चर्चा आहे. शिवसेनेची शिवाजी पार्क (Shivaji Park) इथं दसरा मेळाव्याची परंपरा यंदा खंडित होते की काय अशी स्थिती होती. मात्र हायकोर्टानं उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) बाजूने निकाल दिल्यानंतर शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचाच आवाज घुमणार हे स्पष्ट आहे. सध्या शिंदे गटात अस्वस्थता असल्याचं म्हटलं जातंय. शिंदे गट सुप्रीम कोर्टातही धाव घेण्याच्या तयारीत आहे. अशातच भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी शिवसेनेच्या जिव्हारी लागणारी टीका केली आहे.
उद्धव ठाकरेंवर निशाणा?
उद्धव ठाकरेंना मिळालेलं शिवसेनाप्रमुख पद आणि संपूर्ण पक्षाची ताकद ही बाळासाहेब ठाकरे यांची पुण्याई आहे. त्यांच्यामुळेच उद्धव ठाकरेंचं हे वैभव आहे, अशी टीका अनेकदा केली जाते. वडिलांमुळेच शिवसेनेचा वारसा उद्धव ठाकरेंना मिळाला, असंही उघड बोललं जातं. त्यामुळे केशव उपाध्ये यांनी केलेलं ट्विट उद्धव ठाकरे यांना जिव्हारी लागण्याची दाट शक्यता आहे…
मनसेनंही बांडगुळ म्हटलं…
उद्धव ठाकरे यांच्यावर काही दिवसांपूर्वी मनसेनेही अशीच जिव्हारी लागणारी टीका केली. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी थेट बोलूनही दाखवलं. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्याईवर जगणारे बांडगुळं आहेत. उद्धव ठाकरेंचं कर्तृत्व शून्य आहे. कमजोर मुलावर आई- वडिलांचं प्रेम जास्त असतं, पण कर्तृत्ववान मुलावर त्यांचा विश्वास असतो, असं वक्तव्य संदीप देशपांडे यांनी 22 सप्टेंबर रोजी केलं होतं.
तर आज पुन्हा एकदा संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं. मैदान मिळालंय, पण तिथं बाळासाहेबांचे विचारच मांडा. उगाच शिव्या दिल्या तर मैदान मिळून काय उपयोग आहे, असा सवाल त्यांनी केला. तसेच मशिदीवरील भोंगे, अनधिकृत मदरसे आणि मराठी माणसं मुंबई सोडून का चाललेत, या तीन मुद्द्यांवर बोला, असं आव्हान मनसेनं दिलंय..
उद्धव ठाकरें प्रत्युत्तर देणार?
दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्याची परवानगी मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत उत्साह संचारला आहे. त्यानंतर मनसे, भाजप आणि शिंदे गटाकडून त्यांना जोरदार आव्हान मिळणार हे निश्चित आहे. पण या सर्व टीकांना उद्धव ठाकरे कशा प्रकारे प्रत्युत्तर देतात, याकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागलंय.