Mohit Kamboj | पुराव्यांशिवाय कुणी बोलणार नाही, मोहित कंबोजांच्या ट्विटवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा काय इशारा?
मोहित कंबोज यांच्या ट्विटवर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ' मोहित कंबोज यांनी ट्विट केलंय. कोणताही नेता, नागरिक ट्विट करतो, तव्हा त्याच्याकडे काहीतरी पुरावे असतात.
मुंबईः कुणीही नेता किंवा नागरिक पुराव्यांशिवाय बोलत नाही किंवा ट्विट करत नाही. भाजप नेते मोहित कंबोज यांच्याकडेही पुरावे असतील, म्हणूनच ते बोलतायत. पण यामुळे कुणीही थेट जेलमध्ये जाणार नाही तर तपास यंत्रणांकडे पुरावे दिले जातील. तपास होईल, त्यानंतर दोषी आढळल्यास कारवाई होईल, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. आजपासून विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरु होतंय. या पार्श्वभूमीवर भाजप नेते मोहित कंबोज यांनी सकाळीच केलेलं ट्विट चांगलंच गाजतंय. हर हर महादेव… अब तांडव होगा… असं म्हणत मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीच्या तिसऱ्या नेत्यासाठी धोक्याची घंटा असल्याचं ट्विट केलंय. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेमक्या कोणत्या नेत्यासाठी हे ट्विट आहे, यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. त्यातच सिंचन घोटाळ्या प्रकरणी अजित पवारांकडे हा रोख असल्याचे बोलले जात आहे.
1:- Anil Deshmukh 2:- Nawab Malik 3:- Sanjay Panday 4:- Sanjay Raut 5:- ____________
अपना 100% Strike Rate Hai !
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) August 17, 2022
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
मोहित कंबोज यांच्या ट्विटवर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘ मोहित कंबोज यांनी ट्विट केलंय. कोणताही नेता, नागरिक ट्विट करतो, तव्हा त्याच्याकडे काहीतरी पुरावे असतात. त्या घोटाळ्याबद्दलची कागदपत्र असतील. तपासयंत्रणांना ते पुरावे देतील. असं कोणत्याही व्यक्तीला थेट जेलमध्ये पाठवण्याची पद्धत नाही. तपास यंत्रणांकडे पुरावे दिले जातील, यंत्रणा तपास करतील आणि त्यानंतर त्या पाहिजे त्या कारवाया करतील….
अमोल मिटकरींची प्रतिक्रिया काय?
मोहित कंबोज यांच्या ट्विटवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, हा मोहित कंबोज कोण आहे तर लष्करे देवेंद्रमधील हा तिसरा आहे. तो भाजपचा भोंगा आहे. भाजपचे नेते केवळ अशा धमक्या देत राहतात. मात्र जीएसटी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर का बोलत नाहीत? ईडी कुणावर धाड टाकणार आहे, याची त्याला माहिती असेल तर आधी मोहित कंबोजचीच चौकशी झाली पाहिजे, असं वक्तव्य अमोल मिटकरींनी केलंय.
नाना पटोलेंचं वक्तव्य काय?
मोहित कंबोज किंवा भाजप नेत्याच्या कोणत्याही अशा ट्विटला अथवा धमकीला आम्ही घाबरत नसल्याचं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलंय. ते म्हणाले, महाविकास आघाडीचा कुठलाही नेता, अशा पद्धतीच्या मानसिकतेला घाबरत नाही. महाराष्ट्रात जे ईडीचं सरकार आहे, त्याचं उलटी गिनती सुरु होणार आहे. जनतेचे प्रश्न मांडण्यापासून थांबवण्याचा ईडीकडून प्रयत्न आहे. महाराष्ट्रात ही संस्कृती नाही, जनता त्यांना त्यांची जागा नक्की दाखवणार, असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलंय.