नारायण राणे लागले कामाला, रेल्वेमंत्र्यांची घेतली भेट; कोकणवासियांसाठी तीन महत्त्वाच्या मागण्या
Narayan Rane | यानिमित्ताने नारायण राणे यांनी कोकणाच्या विकासाच्या माध्यमातून राजकीय फासे टाकायला सुरुवात केल्याची चर्चा आहे. मध्यंतरी नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह कोकणात आले होते.
नवी दिल्ली: कोकणात शिवसेनेला शह देण्याच्यादृष्टीने भाजप नेतृत्वाकडून नारायण राणे यांना बळ दिले जात आहे. केंद्रीय मंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नारायण राणे (Narayan Rane) त्यादृष्टीने कामालाही लागले आहेत. नारायण राणे यांनी शनिवारी दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. यावेळी नारायण राणे यांनी कोकणवासियांना फायदेशीर ठरू शकतील असे तीन प्रस्ताव अश्विनी वैष्णव यांच्यासमोर मांडले.
गणेशोत्सवासाठी कोकणात जादा ट्रेन सोडण्यात याव्यात. तसेच कोकण रेल्वेमार्गावर ट्रॅकलगत नारळाची झाडे लावण्यासाठी जमीन द्यावी आणि कुडाळ तालुक्यात टू लेन रोडला परवानगी मिळावी, अशा मागण्या नारायण राणे यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केल्या. आता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव त्या पूर्ण करणार की नाही, हे पाहावे लागेल.
मात्र, यानिमित्ताने नारायण राणे यांनी कोकणाच्या विकासाच्या माध्यमातून राजकीय फासे टाकायला सुरुवात केल्याची चर्चा आहे. मध्यंतरी नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह कोकणात आले होते. त्यामुळे नारायण राणे यांचे भाजपमधील राजकीय वजन वाढले होते. तर काही दिवसांपूर्वीच मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांच्याकडे लघू, सुक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा कारभार सोपवण्यात आला होता. त्यानंतर नारायण राणे आता खऱ्या अर्थाने कामाला लागले आहेत.
राणेंना दादर, माहीमच काय कोकणातही जिंकू देणार नाही: सदा सरवणकर
नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर शिवसेना आणि राणे कुटुंबीयांमधील वाकयुद्धाला अधिकच रंग चढला आहे. काही दिवसांपूर्वीच नितेश राणे यांच्या उपस्थितीत दादरमध्ये भाजप कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. यावरुन शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी राणे कुटुंबीयांना टोला हाणला होता. भाजपला दादर, माहीममध्ये प्रवेश मिळणार नाही. भाजप आणि नितेश राणे यांनी अशी अनेक दुकाने उघडली आहे. त्यांनी कितीही दुकाने उघडू द्या. नितेश राणेंना आम्ही त्यांच्या कोकणातल्या मतदार संघात ही जिंकू देणार नाही, असा इशारा सरवणकर यांनी दिला होता.
संबंधित बातम्या: