Maharashtra Assembly Session : पहिल्या दिवसापासून तुम्ही सत्ता उलथवण्याचा प्रयत्न केला, भास्कर जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
Maharashtra Assembly Session : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. त्यावर बोलताना भास्कर जाधव यांनी भाजपवर सडकून टीका केली.
मुंबई : शिवसेनेचे नेते भास्कर जाधव (bhaskar jadhav) यांनी आज भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. नव्या सरकारचं अभिनंदन करतानाच भास्कर जाधव यांनी भाजपला (bjp) चिमटे काढले. पहिल्या दिवसापासून तुमची कृती सत्ता उलथवून टाकण्याची होती. महाराष्ट्राची सत्ता उलथवून टाकण्याच्या तुमचा प्रयत्न होता. ती संधी तुम्ही साधली. तुम्ही कुणाच्या हातात भोंगा दिला, कुणाच्या हातात हिजाब दिला, कधी कुणाच्या हातात हनुमान चालिसा दिला. तर कधी महाराष्ट्रात सुशांत सिंह राजपूत आणला, कधी महाराष्ट्रात कंगना राणावत आणली, पण सत्ता उलथली गेली नाही, अशा शब्दात भास्कर जाधव यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. तसेच आता तुमच्यासोबत एकीकडे 40 आमदार आहेत. तर दुसरीकडे शिवसैनिक छातीचा कोट करून शिवसेना (shivsena) वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही काय कराल? असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. त्यावर बोलताना भास्कर जाधव यांनी भाजपवर सडकून टीका केली. या सर्वात ज्या भाजपच्या हिंदुत्वाच्या गोष्टी, साधनशुचितेच्या गोष्टी तुम्ही करत आहात. संजय राठोड तुमच्या बाजूने बसले. त्यांचं मंत्रिपद घालवायला तुम्ही काय काय केलं. त्यांना मंत्रिपद दिलं जाणार होतं, तेव्हा तुम्ही महाराष्ट्रात आंदोलन करू असा इशारा दिला. प्रताप सरनाईक आणि यामिनी जाधव यांना ईडी लावली. नियती कुणाला सोडत नाही, आता तुम्हाला त्यांना वाचवायला लागत आहे. बोला राठोड. सरनाईकांचं काय करायचं?, असा सवाल भास्कर जाधव यांनी केला.
शिवसैनिक छातीचा कोट करून उभे
आज शिवसेनेत काय झालंय. एका बाजूला 40 शिलेदार आहेत. तर शिवसैनिक छातीचा कोट करून शिवसेना वाचवायला तयार आहे. कोण कुणाला रक्तबंबाळ करणार आहे. कोण कुणाला धाराशायी करणार आहे. कोण कोणाला पराभूत करणार आहे. त्याचा विचार करा. एकदा हातात तलवार घेतली, रणांगणात उतरला तर जेव्हा हातात तलवार असते तेव्हा कुठं थांबायचं हे ज्याला कळतं तो खरा योद्धा, असं ते म्हणाले.
दिल्लीच्या पातशासाठी सर्व काही
या सभागृहात पुन्हा रामायणाची पुनरावृत्ती घडणार आहे. पुन्हा एकदा महाभारत घडणार आहे. पुन्हा एकदा पानीपत घडणार आहे. पाणीपतच्या युद्धात एका बाजुला ते उभे आहेत. सख्खे भाऊ एकमेकांविरोधात आहेत. लढताहेत कुणासाठी? दिल्लीच्या पातशासाठी लढत आहात. ते पातशहा सही सलामत आहेत. मरताहेत तुम्ही आम्ही आणि तुम्ही पातशहा आहात, असं हल्ला त्यांनी चढवला.