केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरुन मविआ सरकार अस्थिर करण्याचं भाजपचं षडयंत्र; नाना पटोलेंचा आरोप
सत्ता नसल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेला भाजपा सीबीआय, ईडी, आयकर, एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
मुंबई : राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाचे सरकार भक्कम आहे. सरकारच्या कामगिरीवर जनताही समाधानी आहे. परंतु सत्ता नसल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेला भाजपा सीबीआय, ईडी, आयकर, एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रातूनही त्यांना केंद्रीय तपास यंत्रणा कसा त्रास देत आहेत, हे स्पष्ट होत आहे. राज्यातील मविआ सरकार अस्थिर करण्याचे भाजपाचे आतार्यंतचे सर्व प्रयत्न फेल गेले असून आताही त्यांचा कुटील डाव यशस्वी होणार नाही. सरकार पाच वर्षे चालेल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. (BJP’s conspiracy to destabilize the Thackeray government by holding the Central Investigation Agency in hand : Nana Patole)
यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, भाजप केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून सुरुवातीपासून शिवसेना आणि राष्ट्रवादीला त्रास देत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे बोट धरून भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात वाढला. त्याच शिवसेनेला भाजपा आता त्रास देत आहे, हा भाजपचा कृतघ्नपणा आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा मुख्यमंत्री झाला, हे भाजपाला पहावत नसून त्यांची खूर्ची ओढण्याचा प्रयत्न ते करत आहेत.
पटोले म्हणाले की, राज्यात मविआ सरकार स्थापन झाल्यापासून भाजपाचे नेते सरकार अस्थिर करण्यासाठी आटापीटा करत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा या फक्त विरोधी पक्षांच्या लोकांवरच कारवाई करत आहेत. दिल्लीतील राजकीय बॉसच्या इशाऱ्याने विरोधकांवर दबाव आणण्याचे काम ते करत आहेत. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांना दिल्या जात असलेल्या त्रासाला पत्रातून वाचा फोडली आहे. ईडीच्या माध्यमातून विरोधकांना कसा त्रास दिला जातो हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व किरीट सोमय्या यांच्या बोलण्यातून वारंवार उघड झाले आहे.
महाराष्ट्रातील सत्तेपासून वंचित राहिल्याने भाजप मागील दीड वर्षांपासून केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम पद्धतशीरपणे करत आहे. विरोधी पक्षाचे सरकार अस्थिर करण्याचे, विरोधकांचा आवाज दाबण्याचे प्रकार सुरु आहेत. परंतु या दबावतंत्रामुळे भाजपाचे सत्तेचे दिवास्वप्न हे स्वप्नच राहणार आहे. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून कोणत्याही दबावाला हे सरकार बळी पडणार नाही, असेही पटोले म्हणाले.
शिवसेना-राष्ट्रवादीला शुभेच्छा
पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, 2024 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांची युती होणार असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. भारतीय जनता पक्षाविरोधात कोणतीही आघाडी उभी करायची असेल तर ती काँग्रेस पक्षाशिवाय होणे शक्य नाही.
इतर बातम्या
सोनिया गांधींनी शब्द दिलाय, काँग्रेस पाच वर्ष शिवसेनेसोबत राहणार; नाना पटोले यांची ग्वाही
(BJP’s conspiracy to destabilize the Thackeray government by holding the Central Investigation Agency in hand : Nana Patole)