मुंबई : भाजप खासदार नारायण राणे यांनी नुकतीच केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारात राज्यातील एकूण चार नेत्यांना स्थान मिळाले असले तरी राणेंना मिळालेल्या मंत्रिपदाविषयी मोठी चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे पर्यायाने शिवसेनेला शह देण्यासाठी राणे यांना मंत्रिपद देण्यात आल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मोठी प्रतिक्रिया दिली. नारायण राणे (Narayan Rane) यांना ठऱवून मंत्रिपद दिलं आहे, असं नाही. आगामी काळात कटुता कशी कमी होईल यावर केंद्र सरकार काम करतंय असं वाटतंय, असं पाटील यांनी म्हटलंय. ते मुंबईत टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. (central minister post to Narayan Rane is not given to defeat Shiv sena said Chandrakant Patil)
यावेळी बोलताना पाटील यांनी राणे यांच्या शिवसेनेत असलेल्या कार्यकाळावर भाष्य केलं. “नारायण राणे यांनी शिवसेना सोडली, त्याला 18 वर्षे झाली आहेत. कोणाला ठरवून मंत्रिपद दिलंय असं नाही. दोन्ही घराण्यांमध्ये आता हळूहळू सगळ काही चांगलं होतंय. आगामी काळात कटुता कशी कमी होईल यावर केंद्र काम करतंय अस वाटतंय,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
राणेंच्या येण्याने महापालिकेला फायदा
तसेच पुढे बोलताना नारायण राणे यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपला काय फायदा होईल यावरही सविस्तर प्रतिक्रिया दिली. “राणेंच्या येण्यानं महापालिकेत फायदा होईलच. पण शिवसेनेला इशारा देण्यासाठी हे सगळं काही आहे असे नाही. केंद्र सरकारने प्रत्येक विभागाला प्रतिनिधीत्व देता येईल यासाठी प्रयत्न केलाय. त्यामुळे प्रत्येक गोष्टींचा राजकीय अर्थ काढायला नकोय. जसं-जसं माणूस वाढत जातो; तसं-तसं इतर सगळ्या गोष्टी कमी होत जातात, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान, आज सायंकाळी 6 वाजता राष्ट्रपती भवनात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात 43 मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. 43 मंत्र्यांच्या यादीत नारायण राणे यांचं नाव सर्वात वर होतं. त्यामुळे त्यांनी पहिली शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह सर्वच केंद्रीय मंत्री उपस्थित होते.
इतर बातम्या :
जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर एकनाथ खडसेंना पुन्हा मोठा झटका, ईडीकडून चौकशीचे समन्स
(central minister post to Narayan Rane is not given to defeat Shiv sena said Chandrakant Patil)