चंद्रकांत खैरेंचं डोकं गोमूत्राने धुवायला पाहिजे, औरंगाबाद शिवसेनेत ‘शुद्धीकरण’ नाट्य!
मुख्यमंत्र्यांचा ताफा ज्या रस्त्यावरून गेला, त्या रस्त्यावर शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडून रस्त्याचे शुद्धीकरण केले. शिवसैनिकांचं हे निषेधात्मक आंदोलन राज्यभरात चर्चेचा विषय ठरलं. मात्र चंद्रकांत खैरेंचं डोकंच एकदा गोमूत्राने धुवायला पाहिजे, असं प्रत्युत्तर संदिपान भूमरेंनी दिलंय.
औरंगाबादः शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant khaire) यांचं डोकंच आता काही काम करत नाहीये. पैठणच्या सभेतील गर्दी पाहून त्यांना काही सूचत नाहीये. त्यामुळे खैरेंचं डोकंच आता गोमूत्राने धुवायला पाहिजे, असं वक्तव्य रोहयो मंत्री संदिपान भूमरे (Sandipan Bhumre) यांनी केलंय. शिंदे गटातील पैठणचे आमदार आणि मंत्री संदिपान भूमरे यांच्या नेतृत्वात सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा पैठणमध्ये जाहीर सत्कार करण्यात आला. मात्र मुख्यमंत्र्यांचा ताफा ज्या रस्त्यावरून गेला, त्या रस्त्यावर शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडून रस्त्याचे शुद्धीकरण केले. शिवसैनिकांचं हे निषेधात्मक आंदोलन राज्यभरात चर्चेचा विषय ठरलं. मात्र चंद्रकांत खैरेंचं डोकंच एकदा गोमूत्राने धुवायला पाहिजे, असं प्रत्युत्तर संदिपान भूमरेंनी दिलंय.
काय म्हणाले भूमरे इथे पहा…
संदिपान भूमरे यांच्या मतदार संघातला महत्त्वाकांक्षी ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेचं कंत्राट भूमरे यांच्या जावयाला मिळाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय. भूमरे यांच्या जावयानेच रजिस्ट्री करून घेतल्याचा आरोप शिवसेनेतर्फे करण्यात येतोय. मात्र हा आरोप भूमरे यांनी फेटाळला आहे. ज्या कामाचा आरोप केला जातोय त्या कामाचं आणखी टेंडर निघालं नसल्याचा खुलासा भूमरेंनी केला. आणि जावयाने टेंडर घेतलं तर अडचण काय असा सवालही भूमरे यांनी केला.
पैठणच्या सभेच्या आधीपासून आणि नंतरही शिवसेना नेत्यांना भूमरेंशिवाय काहीच दिसत नव्हतं. त्यामुळे ते असे आरोप करत आहेत. आमच्या ब्रह्मगव्हाणचं काम दोन वर्षांपासून बंद आहे. निधीच नव्हता. काम थांबलं होतं. आता निधी मंजूर झालाय. टेंडर कुणीही भरू शकतं. ऑनलाइन टेंडर आहे. त्यामुळे माझा काही संबंध नाही, असं म्हणत भूमरेंनी सर्व आरोप फेटाळून लावले.