मराठा आरक्षण : आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या : चंद्रकांत पाटील
मुंबई : मराठा आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील शिफारशी स्वीकारल्या आहेत, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात दिली. विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरु असून, आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. आज चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत सभागृहात निवेदन दिले. यावेळी विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. मात्र, त्यातही चंद्रकांत पाटील यांनी निवेदन सादर केले. चंद्रकांत पाटील काय […]
मुंबई : मराठा आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील शिफारशी स्वीकारल्या आहेत, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात दिली. विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरु असून, आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. आज चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत सभागृहात निवेदन दिले. यावेळी विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. मात्र, त्यातही चंद्रकांत पाटील यांनी निवेदन सादर केले.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
मराठा आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अहवालातील शिफारशी राज्य मंत्रिमंडळाने स्वीकारल्या आहेत. मराठा समाज मागास असून, त्यांना SEBC मध्ये आरक्षण द्यावे, ही मागासवर्ग आयोगाची शिफारस राज्य मंत्रिमंडळाने स्वीकारल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.
अजित पवार काय म्हणाले?
मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात चर्चेदरम्यान केली. तसेच, मराठा समाजाला आरक्षण देताना घटनात्मक, कायदेशीर अडचणी येऊ नये, यासाठी विरोधी पक्षाची तयारी आहे, असेही ते म्हणाले.
तसेच, मराठा समाजाला आरक्षण द्या, मात्र 52 टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का लावू नका, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
आमच्यावेळी आरक्षणाचा निर्णय घेतला, कोर्टात टिकला नाही, आता निर्णय घेताय, तर कोर्टात टिकायला हवा, यात राजकारण होतंय, असं वाटायला नको, अशा भावना अजित पवारांनी व्यक्त केल्या.
मराठा आरक्षणावरुन विरोधकांमध्ये फूट
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन हिवाळी अधिवेशनात विरोधकांमध्येच फूट पाहायला मिळते आहे. मराठा आरक्षणाचा अहवाल लवकरात लवकर सादर करा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील करत असताना, जर अहवालामुळे घटनात्मक पेच निर्माण होत असेल किंवा तो अहवाल जर कोणी कोर्टात गेलं, तर त्यापेक्षा अहवाल पटलावर सादर करु नका, असे मत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केले. या दोघांमधील मतांतरावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही बोट ठेवले. विरोधी पक्षनेते विखे पाटील आणि अजित पवार यांच्या बोलण्यात अंतर आहे, असे मत चंद्रकांत पाटील म्हणाले.