नवी दिल्ली : महाराष्ट्रातील भाजप खासदारांची उद्या दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बैठक बोलावली आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
उद्या म्हणजेच सोमवारी सायंकाळी सात वाजता भाजप खासदारांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातील सर्व भाजप खासदारांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार असल्याची माहिती आहे.
भाजपच्या गुप्त बैठकांना जोर
दरम्यान, दिल्लीमध्ये भाजप आमदार आशिष शेलार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात नुकतीच गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनाही दिल्लीतून बोलावण्यात आल्याचं समोर आलं होतं. त्यातच, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार हे नेतेही दिल्ली दरबारी येत असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. त्यामुळे दिल्लीत महाराष्ट्राविषयी काही शिजतंय का? असा सवाल उपस्थित होत आहे.
चंद्रकांत पाटील-राज ठाकरे भेट
नुकतीच चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर लगेचच दिल्लीत भाजपच्या पहिल्या फळीतील महत्त्वाचे नेते दिल्लीत दाखल झाले. आता दिल्लीत या नेत्यांसह महाराष्ट्रातील सर्व खासदारांची महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यामुळे राज्यातील भाजप नेत्यांच्या बैठकांकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. यामुळे चर्चांना चांगलंच उधाण आलंय.
संबंधित बातम्या :
मनसे-भाजप भविष्यात एकत्र येणार असेल तर आनंदच आहे; बाळा नांदगावकरांनी दिले युतीचे संकेत
2024 ला आमचं एकच इंजिन असणार, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; चंद्रकांतदादा-राज भेट निष्फळ?