मुंबई : “भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना (Chandrakant Patil on Eknath Khadse) केंद्राने विधानपरिषदेसाठी उमेदवारी का नाही दिली? याबाबत अंदाज व्यक्त करायचा असेल तर केंद्रातील वरिष्ठ नेत्यांनी विचार केला असेल, नाथाभाऊंना किती द्यायचं? नाथाभाऊंना सातवेळा आमदारकी दिली, त्यांच्या सुनेला खासदारकी दिली, मुलीला विधानसभेची उमेदवारी दिली, मुलालाही उमेदवारी दिली, त्यांना विरोधीपक्ष नेता केलं. आता त्यांनी पक्षामध्ये वरिष्ठ कार्यकर्ता म्हणून राहावं असं केंद्राने विचार केला असेल”, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेला खास मुलाखतीत सांगितलं (Chandrakant Patil on Eknath Khadse).
“एवढ्या मोठ्या नेत्यांनी पक्षाची बदनामी होणारं वक्तव्य कशाच्या आधारावर करतोय? हे बघायला हवं. तुम्ही 40 वर्षे राजकारणात आहात. ज्यावेळेला एखाद्या निवडणुकीच्या वेळी केंद्रात तुम्ही नावं पाठवतात तेव्हा केंद्राकडून आणखी काही नावं मागितली जातात. त्यामुळे सर्व तयारी करावी लागते. कारण फॉर्म भरणं आता तितकं सोपं राहिलेलं नाही. दोन ते तीन दिवस लागतात. आता तर लॉकडाऊन आहे. त्यामुळे सहा जणांना तुम्हाला उमेदवारी मिळणार नाही मात्र तयारी करुन ठेवा असं सांगितलं होतं. मिळालं तर ठीक. आता हेच वर्षोनुवर्षे नाथाभाऊंनी केलं नाही का?”, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.
“कुठलाही आरोप जाहीरपणे करताना त्या आरोपांमध्ये काही तथ्य आहे का? हे बघायला पाहिजे. आता अन्यायच्या विषयात मी, देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी खूप प्रयत्न केले. केंद्राने काय विचार केला असेल ते केंद्रालाच माहिती. याशिवाय आमच्या पक्षात वरिष्ठांना जाब विचारायची कार्यपद्धती नाही. एकनाथ खडसे यांच्यावर कुणाची खुन्नस नव्हती की त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली नाही. आता काही कारणं असतील. त्याचा खोलवर विचार करायला हवा”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
“एकनाथ खडसे जो दावा करत आहेती की, स्टॅम्प पेपरवर मार्च महिन्यापूर्वीची तारीख आहे. त्यामुळे उमेदवार आधीच ठरली होती. तर त्याची वस्तूस्थिती अशी आहे की, स्टॅम्पपेपरच्या पहिल्या पानावरची तारीख ही स्टॅम्प वेंडर ट्रेझरीतून स्टॅम्प घेतो त्यावेळीची असते. ती त्याची तारीख आहे. त्याच्या मागची तारीख बघितली तर तिथे 4 मे तारीख दिसेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यादेखील स्टॅम्पपेपरवर पहिली तारीख ही मार्च महिन्याचीच आहे आणि मागे 6 मे आहे”, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
“आपल्या घरातील भांडणं, मतभेद घेऊन टीव्हीवर जावं, अशी आमची कार्यपद्धती नाही. एकच बाजू जगासमोर येत आहे. खोटे आरोप इतके केले जात आहेत की आता ते ऐकूण मलादेखील वाटायला लागलंय की हे खरं आहे की काय? त्यामुळे मी तुमच्यासमोर आलो आहे”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
“नाथाभाऊ आमचे वडील आहेत. नाथाभाऊंनी आम्हाला मुक्ताईनगरात नेऊन दोन थोबाडीत माराव्या, पण त्यांनी घरची भांडणं जगासमोर आणू नयेत”, असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांना केलं. “नाथाभाऊंना खूप मिळालं. अजून मिळायला हवं. पण मिळालं नाही म्हणून लगेच पक्ष सोडण्याची भाषा करु नये, ते आमचे मार्गदर्शक आहेत”, असंदेखील ते म्हणाले
“नाथाभाऊ हे मुरलेले हुशार राजकारणी आहेत. ते बुडत्या जहाजात बसणार नाहीत. काँग्रेसने त्यांना ऑफर दिली तर मग पहिली सीट का नाही दिली? त्यांनी सहाव्या जागेची का ऑफर दिली? “, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.
“तिकीट हा क्षुल्लक विषय, नाथाभाऊ यांची पक्षाशी नाळ जोडली आहे. देवेंद्र फडणवीस आणि नाथाभाऊ यांचं सविस्तर बोलणं झालं, जर लॉकडाऊन नसता तर मी स्वत: चारवेळा मुक्ताईनगरला गेलो असतो”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
“नाथाभाऊचं समाधान झालं की नाही माहित नाही. पण त्यांनी चुकीचा निर्णयय घेऊ नये ही अंबाबाई चरणी प्रार्थना, कुटुंबात भांडणं होतात तशी पक्षातही होतात, ती संपतात”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
संबंधित बातम्या :