राज्यात निवडणुका होणार की नाही?; चंद्रकांतदादांचं भुवया उंचावणारं विधान चर्चेत
मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाण्याची चर्चा आहे. तसं विधानच शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. मला तुमच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी कळत असतात, असं ते म्हणाले.
प्रदीप कापसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे: राज्यातील महापालिका निवडणुकांवरून (corporation election) अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी हिंमत असेल तर विधानसभा आणि महापालिकांच्या निवडणुका एकत्रच घ्या, असं आव्हानच राज्य सरकारला दिलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. राज्यातील निवडणुका लांबणीवर पडणार आहेत. आणि हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापर्यंत या निवडणुका लांबणीवर पडणार आहेत, असं मोठं विधान चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी केलं आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून अनेक तर्कवितर्क वर्तवले जात आहेत.
चंद्रकांत पाटील हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणार आहे. त्यानंतर निवडणूक आयोग वेळ मागणार आहे. त्यानंतर निवडणुका लागतील. तोपर्यंत निवडणुका लांबणीवर पडणार हे स्वाभाविक आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. 18 ऑक्टोबरला सुनावणी आहे. त्यात काय निकाल लागतो, ते कळेल. पण निवडणुका लांबतील, असं ते म्हणाले.
यावेळी त्यांनी राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनाही टोला लगावला. सत्तार यांनी शिंदेगट स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचं विधान केलं होतं. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
सगळं काही नीट चालू असताना असे विषय काढू नये. प्रत्येक पक्षाला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. वाढलेल्या पक्षाच्या आधारे स्वबळावर निवडणुका लढण्याचाही अधिकार आहे. तसा तो भाजपलाही आहे, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाण्याची चर्चा आहे. तसं विधानच शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. मला तुमच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी कळत असतात, असं ते म्हणाले.
दुपारी 2 वाजता चांदनी चौकातील पूल पाडला जाणार आहे. नवीन तंत्रज्ञान वापरून काही सेकंदात पूल पाडला जाणार आहे. सकाळपर्यंत राडारोडा काढला जाईल. आता त्रास होईल. मात्र भविष्यासाठी हे चांगलं आहे, असंही ते म्हणाले.