Chandrakant Patil : चिंता नको! पंकजा मुंडेंची काळजी घ्यायला भाजप समर्थ आहे; चंद्रकांतदादांचा राऊतांवर पलटवार
Chandrakant Patil : नाचता येईना अंगण वाकडे. त्यांना पराभव दिसला होता म्हणून त्या पराभवाची स्क्रिप्ट आधीच लिहून ठेवली होती. त्याच स्क्रिप्टवर ते बोलत राहतात.
पुणे: भाजपमध्ये पंकजा मुंडे (pankaja munde) यांना एकटं पाडण्याचा डाव सुरू आहे. पंकजा यांच्या समर्थकांना तिकीट दिलं जात आहे आणि पंकजा मुंडे यांना वाऱ्यावर सोडलं जात आहे, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी केली आहे. राऊत यांच्या या टीकेचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी समाचार घेतला आहे. चिंता करू नका. पंकजा मुंडेची काळजी करायला भाजप समर्थ आहे. पंकजा मुंडे या भाजपच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीसाच्या घरातील मुलगी आहेत. त्यामुळे त्यांची काळजी करण्याची वेळ आली नाही आम्ही समर्थ आहोत, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. दैनिक सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टीका करण्यात आली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. समानातून रोज टीका होत असते. पण मी समान वाचत नाही आणि दखल घेत नाही, असं पाटील म्हणाले. ते मीडियाशी बोलत होते.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही टीका केली. नाचता येईना अंगण वाकडे. त्यांना पराभव दिसला होता म्हणून त्या पराभवाची स्क्रिप्ट आधीच लिहून ठेवली होती. त्याच स्क्रिप्टवर ते बोलत राहतात. त्यात त्यांचं एक बरं आहे की, आपापसात भांडणं असतानाही त्यांची इको सिस्टम चांगली आहे, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
इतिहास सर्वांना माहीत आहे
संभाजी छत्रपती यांच्या समर्थकांनी शिवसेना भवनाबाहेर पोस्टर लावून शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. त्यावर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. मी यावर टिप्पणी करणं योग्य नाही. इतिहास सर्वांना माहितेय, असंही ते म्हणाले.
मग राष्ट्रवादीने फोटो लावावेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देहू येथील संत तुकाराम महाराज संस्थानच्या शिळा मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी येणार आहेत. या कार्यक्रमानिमित्ताने पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी लावलेल्या फ्लेक्सवर मोदींचे फोटो पांडूरंगापेक्षा मोठे दाखवले आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसने तसे बॅनर लावावेत. त्यामध्ये पांडुरंगाचे फोटो मोठे लावावेत. काही हरकत नाही. हे बॅनर पार्टीकडून लावले नाहीत. कुठंतरी कार्यकर्ता उत्साहाने लावतो. एवढं मॉनिटर का करतात माहिती नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेसने फोटो लावावे. पांडुरंगाचे फोटो मोठे लावावे मोदीचा फोटो छोटा लावावा किंवा लावू नये, असा टोला त्यांनी लगावला.
राऊत काय म्हणाले होते?
शिवसेना नेते संजय राऊत यांनी दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून भाजपवर टीका केली आहे. विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांना भाजपने पुन्हा डावलले. गोपीनाथ मुंडे व पंकजा मुंडे यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवाऱ्या द्यायच्या, सत्तेची पदे द्यायची, पण पंकजा मुंडे यांना एकटे पाडायचे असे भाजपचे धोरण दिसते, अशी टीका राऊत यांनी केली आहे.