चंद्रपूरच्या जावयाने मध्य प्रदेशच्या शिंदे घराण्याचा विजयरथ रोखला!
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील वडगाव प्रभागात राहणाऱ्या प्रा. भाऊराव जांभुळकर यांच्या घरी सध्या उत्सवी वातावरण आहे. मध्य प्रदेशातील गुना मतदारसंघातील दिग्गज शिंदे घराण्याचे वारसदार ज्योतिरादित्य शिंदे यांना सव्वा लाखाने मात देत डॉ. के. पी. यादव यांनी भाजपसाठी ही जागा जिंकली आहे. नवनिर्वाचित खासदार के. पी. यादव हे चंद्रपूरच्या जनता महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राचार्य भाऊराव जांभुळकर यांचे […]
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील वडगाव प्रभागात राहणाऱ्या प्रा. भाऊराव जांभुळकर यांच्या घरी सध्या उत्सवी वातावरण आहे. मध्य प्रदेशातील गुना मतदारसंघातील दिग्गज शिंदे घराण्याचे वारसदार ज्योतिरादित्य शिंदे यांना सव्वा लाखाने मात देत डॉ. के. पी. यादव यांनी भाजपसाठी ही जागा जिंकली आहे. नवनिर्वाचित खासदार के. पी. यादव हे चंद्रपूरच्या जनता महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राचार्य भाऊराव जांभुळकर यांचे जावई आहेत. गुनाच्या महाराजांसारख्या दिग्गज नेत्याला हरवून डॉ. यादव संसदेत पोहोचल्याचा आनंद त्यांच्या सासुरवाडीत झाला आहे.
डॉक्टर कृष्णपाल सिंग यादव नवनिर्वाचित खासदार गुना मध्य प्रदेश… मध्य प्रदेशच्या अशोकनगर जिल्ह्यातील डॉ. यादव सध्या चांगलेच चर्चेत आहेत. डॉक्टर यादव यांचा परिवार काँग्रेस विचारांशी निगडीत होता. यादव यांचे वडील गुना येथील महाराज माधवराव शिंदे यांचे निकटचे सहकारी होते. डॉक्टर कृष्ण पाल सिंग यादव यांनी आपले बीएएमएस वैद्यकीय शिक्षण नागपुरात पूर्ण केले. त्यादरम्यान चंद्रपूरकर अनुराधा जांभुळकर या वर्ग मैत्रिणीशी त्यांनी 2000 साली विवाह केला. विवाहानंतर हे दांपत्य मध्यपदेशच्या गुना मतदारसंघातील अशोक नगर येथे आपली वैद्यकीय सेवा देऊ लागले. घरी काँग्रेसचा वारसा असल्याने डॉक्टर यादव शिंदे घराण्याचे वारसदार ज्योतिरादित्य शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून गणले जाऊ लागले.
राजकारणात उत्तम कामगिरी करत असतानाच या भागातल्या मुंगावली विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसने त्यांना विधानसभा तिकीट नाकारले काँग्रेसवर निष्ठा असतानाही तिकीट नाकारले गेल्याने त्यांनी 2018 झालेल्या मध्यपदेश विधानसभा निवडणुकीत भाजपकडून निवडणूक लढवली. मात्र 2000 एवढ्या कमी अंतराने त्यांचा पराभव झाला. एक संघर्षशील नेता अशी प्रतिमा असलेल्या डॉक्टर यादव यांना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने लोकसभेसाठी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या विरोधात तिकीट देऊ केली. कार्यकर्त्यांचे परिश्रम आणि राजकारणातील धडाडी या बळावर त्यांनी चक्क शिंदे राजघराण्यातील महाराजांनाच धूळ चारली. चंद्रपूरच्या त्यांच्या सासुरवाडीत जांभुळकर यांच्या घरी अर्थात या निवडीने आनंद व्यक्त होत आहे
डॉक्टर के पी यादव यांना भाजपने तिकीट दिल्यावर ज्योतिरादित्य शिंदे यांच्या पत्नीने यांनी सोशल मीडियावर टाकलेला एक फोटो डॉक्टर यादव यांना सहानुभूती देऊन गेला. डॉक्टर यादव ज्योतिरादित्य यांच्यासमवेत फोटो काढण्यासाठी धडपडत असल्याचे या फोटोत नमूद केले गेले. असा उमेदवार शिंदे घराण्याचा समोर कसा टिकणार असा या फोटोतून संकेत दिला गेला. मात्र हाच फोटो डॉक्टर केपी यादव यांच्या विजयाचे कारण ठरला. सध्या देशभर हा फोटो सोशल मीडियावर डॉक्टर के पी यादव यांच्या संदर्भात चांगलाच व्हायरल होत आहे.
नवनिर्वाचित खासदार यादव यांच्या सासुरवाडीत चंद्रपूरच्या जांभूळकर यांच्या घरी आनंद व्यक्त होत असताना त्यांच्या पत्नी चंद्रपूरकरकन्या अनुराधा यांनाही चंद्रपूरकर असल्याचा सार्थ अभिमान वाटत आहे. एका टोकावरच्या जिल्ह्यातून मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे येत चंद्रपुरचे नाव अशाच पद्धतीने उज्वल करत राहू अशी भावना त्यांनी या आनंदाच्या प्रसंगी व्यक्त केली.
माहेरी येण्याच्या निमित्ताने दरवर्षी चंद्रपूरला येणाऱ्या यादव दांपत्याने चंद्रपूरची असलेली आपली नाळ कायम ठेवली आहे. प्राचार्य जांभुळकर देखील चंद्रपूरच्या शैक्षणिक वर्तुळातील दिग्गज माजी आमदार श्रीहरी जीवतोडे यांचे जावई आहेत. अशा रीतीने राजकारणाचा वसा घेतलेली ही चंद्रपूर कन्या मध्यप्रदेशातील गुना येथेही आपल्या सेवा कार्याने जनतेची मन जिंकेल यात शंका नाही.