“छगन भुजबळांनी या वयात तरी खोटं बोलू नये, तुम्ही त्यावेळी जेलमध्ये होता”
भाजपचे महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणावरुन केलेल्या टीकेला उत्तर दिलंय.
नागपूर : भाजपचे महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणावरुन केलेल्या टीकेला उत्तर दिलंय. “छगन भुजबळ हे महाराष्ट्रातील मोठे नेते आहे, मात्र मला दुःखानं सांगावं लागत की या वयात त्यांना खोटं बोलावं लागतं. 2018 ला जेव्हा ही केस सुरू झाली तेव्हा ते जेलमध्ये होते. या संपूर्ण केसची जबाबदारी फडणवीस यांनी मला दिली होती. मी रात्र रात्र बसून या अध्यादेशावर काम केलं आणि अध्यादेश तयार केला. त्यामुळे त्यांच्या या बोलण्यावर किंव येते की असं त्यांना का बोलावं लागलं,” असं मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं (Chandrashekhar Bavankule criticize Chhagan Bhujbal on OBC reservation).
“भूजबळ या वयात रेटून खोटं बोलत आहेत”
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “महाविकासआघाडीचं सरकार आलं तेव्हा आम्ही भुजबळ, वडेट्टीवार, नाना पटोले यांना भेटलो. त्यांना अध्यादेश लॅप्स होत आहे असं सांगितलं. त्यांनी तो कन्टिन्यू केला नाही. हे त्यांच्या अंगावर येत आहे. म्हणून ते आता असं बोलत फिरत आहेत. त्यांनी या वयात तरी खोटं बोलू नये. ते खोटं बोलत आहे आणि रेटून खोटं बोलत आहेत. ओबीसी आंदोलनात राजकारण आम्हाला करायचं नाही. चिंतन बैठक आहे असं सांगितलं, मात्र आता ती राजकीय बैठक ठरत आहे. मात्र मी त्यात जाणार आहे.”
छगन भूजबळ नेमकं काय म्हणाले होते?
ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावं म्हणून राज्य सरकार आणि ओबीसी संघटना लवकरच सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत, असं भुजबळांनी नमूद केलं. केंद्र सरकारकडे ओबीसींच्या इंम्पेरीकल डाटाची मागणी आम्ही करतोय. भाजपचं आजचं आंदोलन राजकारणापोटी आहे. त्यांना दाखवायचं आहे की आम्ही ओबीसींसोबत आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी नेतृत्त्व करावं आणि केंद्र सरकारकडे जाऊन इम्पेरिकल डाटा मागावा” असं भुजबळ म्हणाले.
गेल्या 15 महिन्यात कोरोनामुळे कुणी कुणाच्या घरी जाऊ शकत नव्हतं, म्हणून इंम्पेरिकल डाटा गोळा करणं शक्य झालं नाही. कोरोना संपेपर्यंत इंम्पेरिकल डेटा गोळा करणं शक्य नाही, असंही छगन भुजबळ म्हणाले.
लोणावळ्यात ओबीसी चिंतन बैठक
ओबीसी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी पुणे जिल्ह्यातील लोणावळा भागात चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बैठकीला नोटीस बजावली आहे. या बैठकीला विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे असे सर्व पक्षांचे नेते चिंतन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. पोलिसांनी नोटीस बजावली, तरीही ही चिंतन बैठक होणार असं आयोजकांपैकी एक ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांना सांगितलं.
हेही वाचा :
तर ओबीसींचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांनी करावं, छगन भुजबळ यांची खुली ऑफर
भाजप नेत्यांकडून ओबीसी समाजाचा बुद्धीभेद सुरु, फडणविसांच्या टीकेला भुजबळांचं प्रत्युत्तर
OBC Meeting | लोणावळ्यातील सर्वपक्षीय ओबीसी चिंतन बैठकीला पोलिसांची नोटीस
व्हिडीओ पाहा :
Chandrashekhar Bavankule criticize Chhagan Bhujbal on OBC reservation