झारखंड सरकार पाडण्याचा केंद्राचा डाव, बावकुळेंसह मोहित कंबोज यांचंही एफआयआरमध्ये नाव: नवाब मलिक

| Updated on: Jul 26, 2021 | 5:38 PM

झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचं सरकार पाडण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे हे आमदार फोडण्यासाठी झारखंडला गेले होते. (nawab malik)

झारखंड सरकार पाडण्याचा केंद्राचा डाव, बावकुळेंसह मोहित कंबोज यांचंही एफआयआरमध्ये नाव: नवाब मलिक
nawab malik
Follow us on

मुंबई: झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचं सरकार पाडण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे हे आमदार फोडण्यासाठी झारखंडला गेले होते. झारखंड पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये बावनकुळे यांच्यासह भाजप नेते मोहित कंबोज यांचंही नाव असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (chandrashekhar bawankule and mohit kamboj name in jharkhand police registered fir)

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन हा गौप्यस्फोट केला आहे. झारखंडचे सरकार पाडण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रात पूरस्थिती असताना झारखंड सरकार पाडण्याचा केंद्र सरकार डाव आखत आहे. भाजपचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आमदार फोडण्यासाठी झारखंडला गेले होते. या संदर्भात पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे, मोहित कंबोज यांची नावे आली आहेत, असं मलिक म्हणाले.

त्यांनी पळ काढला

अभिषेक दुबे या पत्रकाराला झारखंडमध्ये अटक केल्यानंतर त्याच्या पोलीस चौकशीतून हा धक्कादायक खुलासा समोर आल्याचे मलिक यांनी सांगितले. दरम्यान हा पत्रकार तीन आमदारांशी संपर्कात होता. या आमदारांशी डील करण्यासाठी महाराष्ट्रातील भाजपचा एक माजी मंत्री देखील गेला असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच 21 जुलै रोजी भाजपचे महाराष्ट्रातील पदाधिकारी मोहीत कंबोज, अमित यादव, आशुतोष ठक्कर हे लोक पैसे घेऊन झारखंड येथे दाखल झाले. मात्र पोलिसांची कुणकुण लागल्यानंतर या लोकांनी तिथून पळ काढला, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील दोन आमदारांचा सहभाग

आमदार फोडाफोडीच्या या कार्यक्रमाची चौकशी करण्यासाठी झारखंड सरकारने एसआयटीची तीन पथके स्थापन केली असून यापैकी एक पथक झारखंडमध्ये, तर दुसरे दिल्लीत आणि तिसरे पथक महाराष्ट्रात तपासासाठी येणार आहे. महाराष्ट्रातील दोन आमदारांचा देखील त्यात समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. झारखंडची एसआयटी टीम महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांना पुर्ण सहकार्य केले जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

50 कोटी, मंत्रिपदाची ऑफर

राज्यात पूरपरिस्थितीमुळे लोक दुःखात असताना भाजपचे लोक झारखंडचे आमदार फोडण्यासाठी पैसे घेऊन जात आहेत. एका – एका आमदारासाठी कोट्यवधी रुपयांचे आमिष दाखविण्यात आले. काँग्रेसच्या आमदारांना भाजपकडून 50 कोटी रुपये आणि मंत्रीपद देण्याची ऑफर होती. पूरपरिस्थितीत हेच पैसे लोकांच्या मदतीसाठी देता आले असते, मात्र झारखंडचे सरकार पाडण्यासाठी भाजपची यंत्रणा काम करत आहे, असा दावाही त्यांनी केला.

मुंबई कनेक्शन

कर्नाटक सरकार पाडत असताना मुंबई कनेक्शन दिसून आले होते. आता झारखंड सरकार पाडतानाही महाराष्ट्र कनेक्शन समोर आले आहे. लोकशाहीला डावलून सरकार स्थापन करण्याचे भाजपचे कारस्थान आता समोर आले असून झारखंड पोलीस नक्कीच याचा तपास करतील अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. यावेळी नवाब मलिक यांनी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव पत्रकार अभिषेक दुबे यांनी पोलीस चौकशीत उघड केले आहे. यामुळे पैशांचा घोडेबाजार करुन झारखंड सरकार बदलण्याचा डाव उघड झाला आहे. महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होणार नाही. भाजपला ते शक्य नाही असेही त्यांनी भाजपला ठणकावून सांगितले.

सत्तेची भाषा योग्य नाही

यावेळी त्यांनी केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली. संकटे येतात त्यावेळी सर्व राजकीय पक्षांची जबाबदारी असते एकसंघ होऊ मदत करण्याची. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सातत्याने केंद्र सरकार मदत करत असल्याचं सांगत आहेत. यात ते कोणतेही राजकारण करत नाहीत. मात्र भाजपचे नेते नको ती भाषा वापरत आहेत. केंद्रीयमंत्री नारायण राणे व त्यांचे चिरंजीव ट्वीट करून जी भाषा वापरत आहेत ते योग्य नाही, असे मलिक म्हणाले. नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही मुख्यमंत्रीपदाच्या वेटींगमध्ये आहोत असे वक्तव्य केले. सर्वांनी संकटकाळात मदत केली पाहिजे. मात्र भाजपचे केंद्रीयमंत्री सत्तेची भाषा बोलतात हे योग्य नाही, असा टोला मलिक यांनी लगावला.

राष्ट्रवादी एक महिन्याचे वेतन देणार

राष्ट्रवादीचे मंत्री, राज्यमंत्री सर्व खासदार, आमदार, एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री रिलीफ फंडात संकटग्रस्त लोकांसाठी देणार आहेत. तशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज जाहीर केल्याची माहिती त्यांनी दिली. सरकार आपल्यापरीने मदत करेल. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आणखी मदत देता येईल का याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सर्वांशी चर्चा करून घेत आहेत. त्यामुळे एक- दोन दिवसात नेमकी मदत काय देणार आहे हे पक्षाच्या माध्यमातून जाहीर करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं. (chandrashekhar bawankule and mohit kamboj name in jharkhand police registered fir)

 

संबंधित बातम्या:

झारखंडचं सरकार पाडण्याच्या कटात चंद्रशेखर बावनकुळेंचा हात?; बावनकुळे म्हणतात…

भाजप-राज ठाकरेंमध्ये नेमकं काय चाललंय? युती होणार की नाही? मुंबईपुरतीच होणार की पुणे, नाशकातही?; वाचा सविस्तर

राज ठाकरेंचा मलाही फोन, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आम्ही भेटणार : सुधीर मुनगंटीवार

(chandrashekhar bawankule and mohit kamboj name in jharkhand police registered fir)