राज्यपाल कोश्यारी यांच्यावरील टीकाकारांना बावनकुळे यांनी सुनावले
जेलमध्ये राहून आल्यामुळे संजय राऊत यांना संवैधानिक असंवैधानिकमधला फरक कळत नाही. ते ज्या लोकांबरोबर राहून आले आहेत, आता त्यांच्यासारखे वागू लागले आहेत.
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Bhagatsinh koshyari ) यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केला. त्यानंतर आता झारखंडचे राज्यपाल रमेश बैस ( Ramesh Bais ) यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. त्यावर सत्ताधारी आणि विरोधकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे. संजय राऊत, सुप्रिया सुळे यांच्यांसह सर्व विरोधकांनी कोश्यारी यांच्यांवर टीका केली आहे. यावेळी संजय राऊत यांनी नवे राज्यपाल रमेश बैस यांना शुभेच्छा दिल्याच. पण इशाराही दिला आहे. बैस आहे की बायस आहेत हे माहीत नाही, असं सांगतानाच राज्यपालांनी घटनाबाह्य सरकारच्या शिफारशी मान्य करताना भान ठेवावं. नाही तर पुन्हा संघर्ष होईल, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले बावनकुळे
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज्यपालांनी अनेक असंवैधानिक कामाना लगाम घालती. नियमबाह्य कामं केली नाहीत. म्हणून विरोधकांचा त्यांच्यांवर राग दिसून येत आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी शिवरायाची प्रेरणा घेवून काम केले. त्यामुळेच केंद्र सरकारने उलट त्यांचा सन्मान केला आहे.सर्वाधिक वाचाळवीर महाविकास आघाडीत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
संजय राऊत यांनाही सुनावले
नवीन राज्यपालांना संजय राऊत यांनी दिलेल्या इशाऱ्यावर बावनकुळे म्हणाले की, जेलमध्ये राहून आल्यामुळे संजय राऊत यांना संवैधानिक असंवैधानिकमधला फरक कळत नाही. ते ज्या लोकांबरोबर राहून आले आहेत, आता त्यांच्यासारखे वागू लागले आहेत.
शरद पवारावर काय म्हणाले
शरद पवार यांनी राज्यपालांची चौकशी करण्याची मागणी केली. त्यावर बावनकुळे यांनी म्हटले की, राज्यपालांचे काम सरकारच्या कामाकडे लक्ष ठेवणे आहे. जे काही चुकीचे होत असेल ते रोखणे आहे. मग अशा राज्यपालांची काय चौकशी करणार? असा प्रश्न त्यांनी विचारला.
सोमय्या राज्यपालांना भेटणार
दरम्यान, भारतीज जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी नव्या राज्यपालांच्या नियुक्तीचं स्वागत केलं आहे. महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल रमेश बैस यांच्याशी माझे आताच फोनवर बोलणे झाले आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने जे काही योगदान द्यायचं ते देणार असल्याचं नव्या राज्यपालांनी सांगितलं.
शिंदे फडणवीस सरकार आणि महाराष्ट्रातील राज्यपाल आता ट्रिपल इंजन वाली सरकार अधिक अधिक गतीने काम करेल याचा मला विश्वास आहे, असं सांगतानाच उद्या भगतसिंह कोश्यारी यांना भेटण्यासाठी राजभवनात जाणार असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं.