एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजपचा डोळा?, बाईक रॅली, मेळाव्यातून शक्तिप्रदर्शन; बावनकुळे ठाण मांडून
आज कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. युवा मोर्चाने या ठिकाणी बाईक रॅलीचे आयोजन केलेले आहे. मी या बाईक रॅलीमध्ये सहभागी होऊन हा आनंद द्विगुणीत करत आहे.
निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, ठाणे: बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केल्यानंतर आता भाजपने (bjp) ठाणे जिल्ह्यावर स्वारी करण्याची तयारी सुरू केली आहे. ठाण्यात (thane) भाजपची ताकद वाढवण्यासाठी भाजपकडून ठाण्यात बाईक रॅली आणि मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे ठाण्यात येऊन शक्तीप्रदर्शन करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्या बालेकिल्ल्यातच भाजपने वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केल्याने शिंदे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात भाजप आज शक्तीप्रदर्शन करणार आहेत. त्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज दिवसभर ठाण्यात विविध बैठका घेणार आहेत. पक्ष वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या जाणार आहेत. तसेच चंद्रशेखर बावनकुळे भाजपच्या बाईक रॅलीत सहभागी होणार आहे. ही बाईक रॅली सिंघानिया शाळेपासून सुरू झाली.
आज बाईक रॅली झाल्यानंतर संध्याकाळी भाजपने कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या मेळाव्याला चंद्रशेखर बावनकुळे संबोधित करणार असून ते कार्यकर्त्यांना पक्ष वाढवण्याच्या टिप्स देणार आहेत.
त्यापूर्वी बाईक रॅलीनंतर बावनकुळे आज दिवसभर ठाणे जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असून पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत.
राज्यात कोणत्याही क्षणी महापालिका निवडणुका लागण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने ठाणे शहर पिंजून काढण्यासाठी कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बावनकुळे यांच्या या दौऱ्याकडे पाहिले जात आहे.
आज कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. युवा मोर्चाने या ठिकाणी बाईक रॅलीचे आयोजन केलेले आहे. मी या बाईक रॅलीमध्ये सहभागी होऊन हा आनंद द्विगुणीत करत आहे. आमची संघटना महाराष्ट्रातील सर्वात मोठी संघटना करण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रचंड जनसमुदाय या या दौऱ्यामध्ये सहभागी झालेला आहे, असं त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री यांच्या ठाण्यात असं नाही. आमची संघटना वाढावावी ही आमची भूमिका आहे. त्यासाठीच हा दौरा आहे, असं त्यांनी सांगितलं. मात्र, भाजपने अचानक ठाण्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे.
तेही एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपने आपला जम बसवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.