उद्धव ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादीचा जादूटोणा, शरद पवार भोंदूबाबा; चंद्रशेखर बावनकुळे यांची खोचक टीका
यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. राहुल गांधी यांचा अभ्यास नाही. ते संसदेत हजर राहत नाहीत. केवळ जनतेच्या टाळ्या मिळवण्याकरता ते बोलत असतात.
सातारा: राष्ट्रवादीचा राज्यात बेईमानीतून सत्ता बनवण्याचा प्रयत्न होता. तो त्यांनी यशस्वी केला. म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यावर एकप्रकारे जादूटोणा करण्याचा हा प्रकार होता. तो त्यांनी केला. त्या जादूटोण्यामुळे उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत गेले. राष्ट्रवादीने हा जादूटोणा केला होता. म्हणून उद्धव ठाकरे यांचं मन डायव्हर्ट झालं आणि दरवाजे बंद करून ते तिकडे गेले, असं सांगतानाच शरद पवार हेच या जादूटोण्याचे भोंदूबाबा आहेत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
चंद्रशेखर बावनकुळे हे आज साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर उपरोधिक टीका केली. राष्ट्रवादीने जादूटोणा करूनच उद्धव ठाकरेंना वश केल्याचा खोचक टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. या जादूटोण्याचा भोंदूबाबा कोण आहे? असा सवाल करताच बावनकुळे हसले.
भोंदूबाबा कोण आहे हे देशाला आणि महाराष्ट्राला माहीत आहे. परत परत सांगायची गरज नाही. एकदा शरद पवारांच्या ताब्यात कोणी आला तर तो सुटत नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.
महाविकास आघाडीचे नेते सत्ता गेल्याने अस्वस्थ झाले आहेत. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे करणाऱ्यांना भिती आहे म्हणून आरोप होत आहेत. त्यांच्या काळात ईडी, सीबीआय होती. त्यावेळी त्यांनी त्यांचा वापर का केला नाही? असा सवालही त्यांनी केला.
यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. राहुल गांधी यांचा अभ्यास नाही. ते संसदेत हजर राहत नाहीत. केवळ जनतेच्या टाळ्या मिळवण्याकरता ते बोलत असतात. काहीतरी संभ्रम तयार करुन यात्रेत टाळ्या मिळवण्यासाठी बोलतात, अशी टीका त्यांनी केली.
राज्य सरकारने प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेलं अतिक्रमण हटवलं आहे. शिंदे-फडणवीस सरकारने हे काम करून दाखवलं. प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेल्या अतिक्रमणावरुन जे आंदोलन झाले त्या आंदोलनात ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले ते गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.