‘ठाकरें’ना अटक ते ‘ठाकरें’च्या मंत्रिमंडळात; भुजबळांचा झंझावात माहीत आहे का?

अत्यंत आक्रमक, डॅशिंग आणि अभ्यासू नेते म्हणून भुजबळ परिचित आहेत. (Chhagan Bhujbal, dashing and fiery leader of Maharashtra )

'ठाकरें'ना अटक ते 'ठाकरें'च्या मंत्रिमंडळात; भुजबळांचा झंझावात माहीत आहे का?
छगन भुजबळ, पालकमंत्री नाशिक
Follow us
| Updated on: Mar 25, 2021 | 5:54 PM

मुंबई: भाजी विक्रेता… शिवसैनिक… मुंबईचे महापौर… आमदार… ते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि घोटाळ्याप्रकरणी दोन वर्षे तुरुंगवास… राज्याचे विद्यमान अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या आयुष्यातील हे टप्पे आहेत. अत्यंत आक्रमक, डॅशिंग आणि अभ्यासू नेते म्हणून भुजबळ परिचित आहेत. आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिलेल्या भुजबळांची राजकीय कारकिर्द कशी राहिली आहे? याचा घेतलेला हा आढावा. (Chhagan Bhujbal, dashing and fiery leader of Maharashtra )

भाजी विक्री करून गुजराण

14 ऑगस्ट 1947 मध्ये छगन भुजबळांचा जन्म झाला. ते दोन वर्षाचे असताना त्यांच्या आई-वडिलांचं निधन झालं. त्यामुळे त्यांची चुलती जानकीबाईने त्यांचा सांभाळ केला. आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी भायखळ्याच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये भाजी विक्रीचा व्यवसाय केला. त्यांचे बंधू मगन आणि ते भायखळा मार्केटमध्ये पायी जाऊन भाजी खरेदी करायचे आणि माझगावच्या घराबाहेर भाजी विक्री करायचे. याच काळात त्यांचं शिक्षणही सुरू होतं. त्यांनी मेकॅनिकल इंजिनीयरिंगचा डिप्लोमा घेतला आहे.

बाळासाहेबांचं भाषण ऐकलं अन्

60च्या दशकात शिवसेनेची स्थापना झाली. बाळासाहेब ठाकरे नावाचा झंझावात महाराष्ट्रात निर्माण झाला. बाळासाहेबांची भाषणं ऐकण्यासाठी त्यावेळी तरुणांच्या उड्या पडायच्या. भुजबळांनीही त्याकाळी शिवाजी पार्कातील बाळासाहेब ठाकरे यांची सभा ऐकली. या सभेतील बाळासाहेबांच्या भाषणाने ते प्रभावित झाले आणि ते शिवसैनिक झाले. तेव्हा शिवसेना केवळ मुंबईपुरतीच मर्यादित होती. भुजबळांनी शिवसेना खेड्यापाड्यात नेली. स्कूटरवर बसून ते शिवसेनेचा प्रचार करायचे. भुजबळांसारख्या शिवसैनिकांकडून होणारा प्रचार आणि बाळासाहेबांची मुलुख मैदानी तोफ… या बळावर शिवसेनेने ग्रामीण भागात जम बसवला. ग्रामीण भागातही शिवसेनेची विजयी घोडदौड सुरू झाली.

नगरसेवक, महापौर ते आमदार

1973 मध्ये महापालिकेच्या निवडणुकीत छगन भुजबळ शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले. 1984मध्ये शिवसेना महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष बनला. त्यावेळी भुजबळ हे पालिकेतील विरोधी पक्षनेते होते. त्यानंतरच्या निवडणुकीत शिवसेना विजयी झाली आणि भुजबळ महापौर बनले. भुजबळ दोनवेळा महापौर होते. त्यांनी मुंबईला ‘स्वच्छ आणि हरित’ करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ‘सुंदर मुंबई, मराठी मुंबई’ची मोहीम राबवली. त्यानंतर 1985 आणि 1990 मध्ये शिवसेनेचे आमदार म्हणून ते निवडून आले. माझगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले ते शिवसेनेचे एकमेव आमदार होते.

वेषांतर करून कर्नाटकात धडक

1986मध्ये कर्नाटकमध्ये सीमाप्रश्न पेटला होता. शिवसेनेने या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकात प्रवेश बंदी करण्यात आली होती. पण नाटक आणि सिनेमाचं वेड असलेले भुजबळ मात्र कर्नाटकात अवतरले होते. बुलगानिन दाढी, डोक्यावर फेल्ट हॅट, पांढऱ्या रंगाचा कोट आणि हातात पाईप… अशा वेषात कानडी पोलिसांना गुंगारा देऊन ते बेळगावच्या एका मैदानावर आले होते. तिथे भाषण करून त्यांनी मराठी माणसांना चेतवण्याचं काम केलं. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. भुजबळांच्या या डेअरिंगमुळे बाळासाहेब जाम खूश झाले होते. त्यांनी शिवाजी पार्कात जाहीर सभेत भुजबळांचा सत्कार केला होता.

शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये

पालिकेपासून विधानसभेपर्यंत शिवसेनेचा आवाज बुलंद करणाऱ्या भुजबळांना शिवसेनेने 1990 मध्ये झटका दिला. 1990 मध्ये युतीने 85 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे भुजबळच विरोधी पक्षनेते होतील अशी चर्चा होती. मात्र, बाळासाहेब ठाकरेंनी विरोधी पक्षनेतेपदाची माळ मनोहर जोशींच्या गळ्यात टाकली. त्यामुळे भुजबळ नाराज झाले होते. या नाराजीनंतर त्यांनी शरद पवारांच्या नेतृत्वात 9 आमदारांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ही 1991ची गोष्ट. मात्र मंडल कमिशनच्या मुद्दयावरून शिवसेनेशी मतभेद असल्याने आपण शिवसेना सोडत असल्याचं भुजबळांनी सांगितलं होतं. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ते दहा दिवस नागपुरात मुक्कामी होते. शिवसैनिकांकडून हल्ला होण्याच्या भीतीने ते नागपुरात थांबले होते. शिवसेना सोडल्यामुळे शिवसैनिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला होता. त्यांच्या मुंबईतील घरावर शिवसैनिकांनी हल्ल्याचा प्रयत्नही केला होता. भुजबळांनी काँग्रेसमध्ये आल्यानंतर 1992मध्ये समता परिषदेची स्थापना केली. या परिषदेच्या माध्यमातून फुले-आंबेडकरांचा विचार पुढे नेण्याचं काम त्यांनी सुरू केलं. ओबीसींचं नेतृत्व करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. परंतु, त्यानंतर बाबरी मशीद पाडली गेली आणि देशातील राजकारणच बदलून गेलं.

आणि भुजबळांनी मतदारसंघ सोडला…

माझगावमध्ये तेव्हाचे शिवसेनेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांनी भुजबळांचा पराभव केला होता. ज्या माझगावमधून शिवसेनेचे एकमेव आमदार म्हणून निवडून आले. त्याच माझगावमध्ये पराभव पत्करावा लागल्याने त्यानंतर भुजबळांनी पुन्हा मुंबईतून निवडणूक लढवली नाही. त्यांनी थेट नाशिक जिल्ह्यातील येवला येथून 1999मध्ये निवडणूक लढवली आणि विजयीही झाले.

लखोबा आणि टी. बाळू

भुजबळांनी शिवसेना सोडल्यानंतर बाळासाहेब ठाकरे त्यांचा उल्लेख ‘लखोबा लोखंडे’ असाच करायचे. तर भुजबळ बाळासाहेबांचा उल्लेख ‘टी. बाळू’ करायचे. मात्र, कालांतराने म्हणजे 15 वर्षानंतर या दोन्ही नेत्यांमधील कटुता संपली आणि त्यांचा घरोबाही वाढला होता.

अन् बाळासाहेबांना अटक केली

1999मध्ये शरद पवारांनी काँग्रेस सोडली आणि राष्ट्रवादीची स्थापना केली. त्याचवर्षी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आणि या सरकारमध्ये भुजबळ उपमुख्यमंत्री झाले. त्याचबरोबर त्यांच्याकडे गृहमंत्रालयही होतं. गृहमंत्री म्हणून त्यांनी कठोर निर्णय घेतले. एवढेच नव्हे तर त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याची परवानगीही दिली. मुंबई दंगल प्रकरणी त्यांनी बाळासाहेबांना अटक करण्याचं फर्मान काढलं होतं. त्यामुळे मुंबई अक्षरश: थांबली होती. सर्व व्यवहार ठप्प झाले होते. बाळासाहेबांच्या अटकेच्या निषेधार्थ मुंबईत कडकडीत बंद पुकारण्यात आला होता. मात्र अटकेनंतर काही तासातच बाळासाहेबांना जामिनावर सोडण्यात आलं.

भुजबळांना अटक

दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी आणि बेहिशोबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी त्यांच्यावर आरोप झाले. या प्रकरणी ईडीने त्यांना मार्च 2016मध्ये अटक केली. त्यांची रवानगी मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात झाली. त्यांना अंडा सेलमध्ये राहावं लागलं. दोन वर्षे ते तुरुंगात होते. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला.

अंडा सेलमध्ये दोन वर्ष, तरीही दमदार कमबॅक

बेहिशोबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी अटक झालेले भुजबळ आता राजकारणातून संपले असं बोललं जात होतं. पण भुजबळांसारखा डॅशिंग नेता सहजासहजी हार मानणारा नाही. त्यांनी राजकारणात पुन्हा कमबॅक केलं. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा येवल्यातून 60 हजाराहून अधिक मताधिक्क्यानं विजय झाला. त्यानंतर त्यांना ठाकरे सरकारमध्ये अन्न व नागरी पुरवठा खात्याचं मंत्रिपद मिळालं. भुजबळांच्या राजकारणाची नवी इनिंग सुरू झाली आहे.

भुजबळ नॉलेज सिटी

वांद्रे येथे भुजबळांची ‘मुंबई एज्युकेशन ट्रस्ट’ आहे. या ठिकाणी बिजनेस मॅनेजमेटंपासून ते इंजिनीयरिंग, फार्मसीसहीत अनेक कोर्स शिकवले जातात. ‘भुजबळ नॉलेज सिटी’चीही त्यांनी स्थापना केली आहे. (Chhagan Bhujbal, dashing and fiery leader of Maharashtra )

नाशिकमधील कामे

नाशिक-मुंबई रस्त्याचं चौपदरीकरण नाशिकची द्राक्ष आणि वाईन उद्योग जगाच्या नकाशावर आणले येवल्याच्या पैठणीला बाजारपेठ मिळवून दिली. (Chhagan Bhujbal, dashing and fiery leader of Maharashtra )

आरोप

तेलगी प्रकरणी भुजबळांवर भ्रष्टाचाराचा आरोप मुलाला आणि पुतण्याला तिकीट दिल्यामुळे घराणेशाहीचा आरोप सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना जमिनी बळकावल्याचा आरोप (Chhagan Bhujbal, dashing and fiery leader of Maharashtra )

संबंधित बातम्या:

वडील गिरणी कामगार, चाळीत बालपण गेलं; चंद्रकांतदादांविषयी हे माहीत आहे का?

आईची मृत्यूशी झुंज, तरीही कोरोना काळात जनतेसाठी रस्त्यावर; जाणून घ्या, राजेश टोपेंविषयी!

‘सुपारी बाग’ व ‘बाकडा कंपनी’ला ‘अडकित्ता बाग’चा पर्याय; कसं आहे ‘संकटमोचक’ गिरीश महाजनाचं राजकारण!

(Chhagan Bhujbal, dashing and fiery leader of Maharashtra )

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.