मुंबई : त्यांच्या मंचावर त्यांनी माझा फोटो लावला होता. त्यांच्या पोस्टर्सवरही माझा फोटो होता. त्यांनी माझा फोटो लावला. आपलं नाणं चालणार नाही हे त्यांना माहीत आहे, त्यामुळेच त्यांनी माझा फोटो लावलाय, असं म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवार यांच्या गटाला माझा फोटो लावू नका अशा अप्रत्यक्ष सूचनाच दिल्या आहेत. त्याबाबत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना डिवचण्यात आलं. त्यावर भुजबळ यांनी मोठं विधान केलं आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
साहेबांचा फोटो ठेवला पाहिजे. त्यांचा मान राखूया. राखलाच पाहिजे, असं मत मी सर्वांसमोर मांडलं. त्यामुळे आम्ही फोटो वापरला. पण काल साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं माझा फोटो वापरू नये. आमच्या गटातील नेते मंडळी बसून त्यावर विचार करतील, असं सूचक विधान छगन भुजबळ यांनी केलं आहे.
मागच्यावर्षी राज्यात जे घडलं, त्यातून निर्माण झालेले प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाने केलेली उकल त्याचा अभ्यास अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने केला. त्यानंतर आम्ही सरकारमध्ये जायचं ठरवलं. तेव्हा याचा सर्व अभ्यास केला. वेगवेगळ्या कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घेतला आहे. कायदेतज्ज्ञांनी आम्हाला सल्ला दिला. काही मार्ग सांगितलं. त्या मार्गाने गेल्यावर अपात्र होणार नाही. दोन चार कायदेतज्ज्ञांशी चर्चा केल्यावर खात्री पटली. विश्वास बसला त्यानंतर पुढची पावलं उचलली आहेत, असं भुजबळ म्हणाले.
आम्ही सरकारमध्ये सामील होण्या आधी कागदपत्रं तयार केल्या. आमदारांच्या सह्या घेतल्या आहेत. आयोगाकडे याचिका दाखल केल्या आहेत. अजित पवार पक्षाचे प्रमुख आहेत. ते राहतील. असं त्यात नमूद केलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. पक्षाची घटना, प्रचलित राजकीय पक्षाबाबतचे निवडणूक आयोगाचे नियम याची चर्चा करून आधीच मांडणी केली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारलं नाही. 1999मध्ये मी प्रदेशाध्यक्ष होतो. चार महिने प्रदेशाध्यक्ष होतो. अध्यक्षांची कामे मोठी आहेत. देशभर फिरायचं असतं. मंत्र्यांची कामे बोलावलं तर जायचं असतं. मी शरद पवार यांच्यासोबत होतो तेव्हा प्रमुख वक्ता म्हणून जायचो. पण या पुढेही अजित पवारांच्या नेतृत्वात पक्षाने सांगितलं थांबा तर थांबेल, असंही ते म्हणाले.