प्रियांका चतुर्वेदी, सौंदर्य, खासदारकी अन् संजय शिरसाट यांच्या त्या वक्तव्यावर चंद्रकांत खैरे यांचं स्पष्टीकरण; म्हणाले…
Chandakant Khaire on Sanjay Shirsat : प्रियांका चतुर्वेदी यांच्याबाबतच्या संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर चंद्रकांत खैरे यांचं स्पष्टीकरण; शिरसाट यांच्यावर हल्लाबोल, म्हणाले...
छत्रपती संभाजीनगर | 31 जुलै 2023 : शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे ठाकरे गटाच्या राज्यसभेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्यावर टीका केली आहे. ही टीका करताना संजय शिरसाट यांनी प्रियांका चतुर्वेदी यांच्या सौंदर्यामुळे राजकारणात पुढे गेल्या, असं वक्तव्य केलं. हे बोलत असताना शिरसाट यांनी चंद्रकांत खैरे यांच्या जुन्या वक्तव्याचा संदर्भ दिला. या सगळ्या प्रकरणावर आता ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत खैरे यांनी गंभीर आरोप केलेत.
संजय शिरसाट हा थर्ड क्लास माणूस आहे. डान्स बार आणि क्लबमध्ये जाणारा माणूस आहे. हे सगळ्या दुनियेला माहिती आहे. संजय शिरसाट यांच्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रतिमा मालिन होत आहे, असं चंद्रकांत खैरे म्हणालेत.
संजय शिरसाट लावलाव्या करतात. मला बाजूला करण्याचा डाव या मूर्खाचा आहे. आता जर गोष्टी समोर आल्या तर अनेक मुली शिरसाट यांच्या विरोधात उभ्या राहतील, असं चंद्रकात खैरे म्हणालेत.
वेळ पडली तर संजय शिरसाटला आम्ही शिवसेना स्टाईलने सरळ करू, असा इशाराही खैरेंनी दिला आहे.
एकीकडे मला चढवायचे आणि डाऊन करायचे असा याचा डाव आहे. एखाद्या दिवशी माझी खोपडी सरकली तर मी काहीही करीन, असा गर्भित इशारा चंद्रकांत खैरे यांनी आमदार संजय शिरसाट यांना दिला आहे.
संजय शिरसाट यांचं वक्तव्य काय?
प्रियांका चतुर्वेदी या मुळात काँग्रेसमधून गद्दारी करून शिवसेनेत आल्या आहेत. आता त्या आम्हाला गद्दार म्हणत आहे. प्रियांका चतुर्वेदी यांचं सौंदर्य पाहू आदित्य ठाकरे यांनी त्यांना राज्यसभा खासदार केलं, असं चंद्रकांत खैरेच म्हणाले होते, असं संजय शिरसाट यांनी सांगितलं. त्यावर आता प्रतिक्रिया येत आहेत.
प्रियांका चतुर्वेदी यांची प्रतिक्रिया
मी चारित्र्यहीन व्यक्तीबद्दल काही बोलणार नाही. मला जे उत्तर द्यायचं होतं ते मी दिलं आहे. हे गद्दार लोक आहेत. त्यांना कोणतंही चारित्र्य नाही, असं म्हणत संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर प्रियांका चतुर्वेदी यांनी टीव्ही 9 मराठी कडे प्रतिक्रिया दिली आहे.