अजित पवार शरीराने वज्रमूठसभेत पण मनाने कुठे? 4 दिवसात कळेल!; शिवसेना नेत्याचं वक्तव्य
Sanjay Shirsat on Ajit Pawar : 3 पक्ष येऊन आज गर्दी करतायेत, पण तो केवळ केविलवाणा प्रयत्न!; शिवसेनेच्या नेत्याचं मविआच्या वज्रमूठ सभेवर टीकास्त्र
छत्रपती संभाजीनगर : मागच्या काही दिवसांपासून अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. राजकीय वर्तुळात सातत्याने हा विषय चर्चेत येत आहे. अशात अजित पवार यांनी स्वत: यावर स्पष्टीकरण दिलं आहे. जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच असणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलं. पण अजित पवार भाजपसोबत येतील, असा दावा युतीकडून केला जात आहे. शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी अजित पवार चार दिवसात मोठा निर्णय घेतील असं म्हटलं आहे. तसंच आज महाविकास आघाडीची मुंबईत वज्रमूठ सभा होणार आहे. मुंबईतील बीकेसी मैदानावर होणाऱ्या या सभेवरही शिरसाट यांनी टीका केली आहे.
अजित पवार यांना आज सगळ्यात जास्त त्रास होत असेल. त्यांना सभेत खुर्ची आहे की नाही ते पण माहीत नाही. अजित पवार सभेत आले तर काय बोलणार माहीत नाही. पण ते मनापासून या सभेत नाहीत. शरीराने ते सभेत असतील आणि ते मनातून कुठे आहेत, हे 4 दिवसात कळेल. लवकरच सगळ्यांना दिसेल. अजितदादा सगळे विषय हसून खेळून टोलवत आहेत. याचाच अर्थ त्यांच्या मनात काहीतरी आहे ते 100 टक्के निर्णय घेतील, असं शिरसाट म्हणालेत.
या पूर्वी सुद्धा बीकेसी मैदानावर बाळासाहेब ठाकरेंनी सभा घेतल्या आहेत. त्या सभांसोबत आजच्या सभेची बरोबरी करता येणार नाही. 3 पक्ष येऊन आज गर्दी करताय आणि आम्ही सोबत आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करत आहेत. पण या तिन्ही पक्षांच्या सभेमुळे महाराष्ट्र कुणाच्या मागे ते कळत नाही. सभेमुळे वातावरण बदलतंय, हा समज चुकीचा आहे, असं शिरसाट म्हणाले आहेत.
शिवसेना प्रमुख मला म्हणायचे गर्दी होते मग मतदान का मिळत नाही? त्यामुळं या सभेकडे फार लक्ष द्यायची गरज नाही. सभेचा धुरळा उडणार नाही. थोडा बहुत उडाला तर आम्ही पाणी मारून शांत करू, असंही शिरसाट म्हणालेत.
भाजप आणि शिवसेना मुस्लिम विरोधक नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदी दोघेही मुस्लिम विरोधक नाहीत. अनेक तरुणांची माथी दहशतवादी भडकवतात ते थांबले पाहिजे, म्हणून आम्ही भूमिका घेतो, असंही शिरसाट यांनी यावेळी स्पष्ट केलं.