बाळासाहेब असते तर म्हणाले असते गळ्यात कॅमेरा अडकवून जंगलात जा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
आता हे मुंगेरीलाल सारखे स्वप्नं पाहू लागले आहेत, चक्क पंतप्रधान पदाचे स्वप्नं पडू लागली आहेत. प्रधानमंत्री व्हावे तर मोदी सारख्या नेत्याने व्हावे, त्यांची टिंगल हे करतात. कुठे फेडणार हे पाप अशीही टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
धाराशीव | 7 फेब्रुवारी 2024 : धाराशीव येथे शिवसंकल्प मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. बाळासाहेब म्हणायचे माझी शिवसेना जेव्हा कॉंग्रेस होईल तेव्हा दुकान बंद करेल, मात्र यांनी तर कॉंग्रेस सोबत हात मिळवणी केली. आज त्यांच्या कार्यकर्त्यांना गाढायची भाषा करताय, ज्यांनी शिवसेना उभी केली. नियती तुम्हाला माफ करणार नाही. आपण जे पेराल ते उगवणार आहे. 50 आमदारांनी चुकीचे पाऊल उचलले असते तर आपण आला असता का ? एवढ्या संख्येने येथे असा सवाल यावेळी जमलेल्या शिवसैनिकांना यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
आमचं हे चोरलं ते चोरलं हे रोज रडगाणे आपण ऐकताय. बाळासाहेबांचे विचार चोरायची गोष्ट नाही. तुम्ही संपत्ती चोरली. 50 कोटी शिवसेनेच्या खात्यातले द्या असे पत्र दिले. एका मिनिटात पैसे परत देण्याच्या सूचना आपण केल्या, त्यांना पक्ष, विचार नको होता. शिवसैनिकांच्या घामाचे पैसे तुम्ही घेतले तुम्हाला लखलाभ असो. आम्हाला विचार हवे अशा शद्बात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
बाळासाहेब असते तर ?
माझ्यासकट शिवसैनिकांवर अनेक केसेस आहेत. आंदोलन केली आहेत. शिवसेना वाढविली आहे. यांनी शिवसेना कॉंग्रेसच्या दावणीला बांधली. बाळासाहेबांच्या विचारांवर नांगर फिरविला. फंद फितूरी केली. त्यांना कार्यकर्त्यांची किमंत नाही. कमवायला, जपायला वेळ लागतो. गमवायला वेळ लागत नाही. केसेस जाऊ द्या, शरीरातून घामाचा एक थेंब तरी काढला का? सोन्याचा चमचा घेऊन आल्याने त्यांना किंमत कळणार नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. बाळासाहेबांना एकटं सोडून 5 स्टारवर गेलात, विसरलात वडील आहेत. बाळासाहेब असते तर म्हणाले असते गळ्यात कॅमेरा अडकवून जंगलात जा अशीही टीका त्यांनी ठाकरे यांच्यावर केली.
मोदी गॅरंटीचे लाभार्थी बनायचे…आणि
उद्धव ठाकरे यांनी काल कोकणातून येताना आरामदायी वंदे भारत ट्रेनमधून प्रवास केला. यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना लक्ष्य केले. ठाकरे यांनी तिला आधी विरोध केला होता. हे म्हणजे आधी टीका करायची नंतर मोदी गॅरंटीचे लाभार्थी बनायचे अशी दुटप्पी भुमिका आहे, बाळासाहेब ठोस भुमिका घ्यायचे असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.