Gulabrao Patil : मुख्यमंत्री बरोबर बोलतात, पन्नास थरांची दहीहंडी फोडली म्हणूनच राज्यात सत्तांतरण; गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया
आम्ही पन्नास थरांची दहीहंडी (Dahi Handi) फोडली म्हणूनच राज्यात सत्तांतर झाले, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एका कार्यक्रमात केले होते. त्यावर आता पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जळगाव : आम्ही पन्नास थरांची दहीहंडी (Dahi Handi) फोडली म्हणूनच राज्यात सत्तांतर झाले, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एका कार्यक्रमात केले होते. त्यावर आता पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री बरोबर बोलत आहेत. एकनाथ शिंदे यांनी पन्नास थरांची दहीहंडी फोडली म्हणूनच राज्यात सत्तांतर झाले. त्यांनी जर पन्नास थरांची दहीहंडी फोडली नसती तर राज्यात सत्तांतर अशक्य होते, असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. मात्र त्यांनी यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जळगाव जिल्हा दौऱ्याबाबत बोलणे टाळले आहे. अदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याबाबत त्यांना विचारले असता, आदित्य ठाकरे यांचे पक्षाचे काम आहे त्यासाठी ते येत आहेत त्यांना येऊ द्या. त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम केलंच पाहिजे अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी दिली आहे.
‘मुख्यमंत्री बरोबर बोलले’
राज्यात गेल्या दोन महिन्यात वेगवान घडामोडी घडल्या, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले. सरकार अल्पमतात असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. शिंदे यांना त्यावेळी अपक्ष आणि शिवसेनेच्या मिळून एकूण 50 आमदारांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर अनपेक्षीतरित्या मुख्यमंत्रीपदाची माळ शिंदे यांच्या गळ्यात पडली. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल एका कार्यक्रमात म्हटलं की, आम्ही 50 थरांची दहीहंडी फोडली म्हणून राज्यात सत्ता बदल झाला. याबाबत गुलाबराव पाटलांना विचारले असता त्यांनी म्हटलं की, मुख्यमंत्री बरोबर बोलत आहेत. एकनाथ शिंदे यांनी 50 थरांची दहीहंडी फोडली म्हणूनच राज्यात सत्ता बदल झाला.
आदित्य ठाकरेंवर बोलणे टाळले
युवासेना प्रमुख आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची तोफ जळगावमध्ये धडाडणार आहे. याबाबत गुलाबराव पाटलांना विचारले असता त्यांनी सावध भूमिका घेतल्याचे पहायला मिळाले. आदित्य ठाकरे यांना जळगावला येऊ द्यात, ते पक्षाच्या कामासाठी येत आहेत. ते त्यांचं काम आहे आणि ते त्यांनी केलंच पाहिजे अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.