Eknath Shinde : सुरक्षेच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांकडून बगल? वळसे पाटलांनी सांगितली खरी कहाणी..!
सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडीच्या काळात गडचिरोलीचे पालकमंत्री देखील होते. दरम्यानच्या काळात जिल्ह्याला घेऊन काही निर्णय झाले होते. निर्णय होताच त्यांना नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आले होते. एवढेच नाहीतर यामध्ये कुटुंबियांचाही समावेश असणार असा उल्लेख करण्यात आला होता.
मुंबई : (Eknath Shinde) एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांना नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आले होते. हे प्रकरण जुने असले तरी शिंदे गटातील आमदरांमुळे पुन्हा नव्याने चर्चेत आले आहे. नक्षलवाद्यांची (Threat letter) धमकी असताना देखील शिंदे यांना Z सुरक्षा देण्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नकार दिल्याचा आरोप आ. सुहास कांदे यांनी केला होता तर आ. शंभूराज देसाई यांनीही त्याला दुजोरा दिला. मात्र, ज्यांच्या बाबतीत ही घटना झाली त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत बोलण्यास टाळाटाळ केली. या प्रश्नाला त्यांनी बगल देत काम करताना धमक्या ह्या येणारच, नक्षली भागात उद्योग उभारत असताना ही घटना झाल्याचे त्यांनी सांगितले पण सुरक्षेाबाबत कोणतेच विधान केले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर उत्तर देण्याचे टाळले की काय असा सवाल उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे (Dilip Walse Patil) माजी गृहमंत्री वळसे पाटलांनी यामागची खरी कहाणी सांगितली आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेवरुन आरोप-प्रत्यारोप होत असताना शिंदे यांनी कुणावर आरोप न करता आता काम करताना अशा धमक्या ह्या येणारच असल्याचे सांगितले. तर मी कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही. त्यावेळी गडचिरोलीतील नक्षली भागात उद्योग उभारणीचे काम सुरु असताना अशा धमक्या पत्राद्वारे आल्याचे त्यांनी सांगितले. पण सुरक्षेबाबबत ठाकरे सरकारने कोणती भूमिका घेतली याबाबत त्यांनी काहीच सांगितले नाही. त्यामुळे त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करण्याचे टाळले की असे काहीच झालेच नाही हे त्यांना सांगायचे होते ते स्पष्ट झाले नाही.
माजी गृहमंत्र्यांकडून आरोपांचे खंडण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरक्षेच्या प्रश्नाला बगल दिली असली तरी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्या दरम्यानची परस्थिती सांगितली आहे. दरम्यानच्या काळात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना ‘झेड’ सुरक्षा दिली होती. एवढेच नाहीतर शिंदे यांना जी धमकी नक्षलवाद्यांकडून आली होती त्यामुळे पोलीस विभागाला विशेष सूचना देण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले आहे. त्यामुळे सध्या जी चर्चा सुरु आहे ती अनावश्यक असल्याचेही म्हणत दिलीप वळसे पाटलांनी होत असलेल्या आरोपांचे खंडण केले आहे.
नक्षलवाद्यांचे धमकी पत्र
सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडीच्या काळात गडचिरोलीचे पालकमंत्री देखील होते. दरम्यानच्या काळात जिल्ह्याला घेऊन काही निर्णय झाले होते. निर्णय होताच त्यांना नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आले होते. एवढेच नाहीतर यामध्ये कुटुंबियांचाही समावेश असणार असा उल्लेख करण्यात आला होता. चौकशीअंती यामध्ये तथ्य असल्याचे शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले होते.