Sanjay Rathod: इकडे संजय राठोडांचा शपथविधी, तिकडे चित्रा वाघांची डरकाळी, म्हणाल्या, “लढेंगे भी और जितेंगे भी!”
पूजा चव्हाण प्रकरणावरून चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी ट्विट करत हल्लाबोल केलाय.
मुंबई : शिंदे गटातील आमदार संजय राठोडांना (Sanjay Rathod) मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलंय. त्यांनी आज मंत्रिपदाच्या गोपनियतेची शपथ घेतली आहे. संजय राठोड हे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. पूजा चव्हाण (Pooja Chavan) मृत्यू प्रकरणात त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. भाजपनेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. अखेर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. पण आता त्याचं पुन्हा एकदा त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यावरून भापच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी टीका केली आहे. त्यांनी ट्विट करत राठोडांना मंत्रिपद देणं योग्य नसल्याचं म्हटलंय. “पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं, हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास लडेंगे….जितेंगे”, असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली होती. राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा यासाठी त्यांनी वारंवार पाठपुरावा केला. अन् अखेर राठोडांना राजीनामा द्यावा लागला होता. पण आज राठोड यांनी शिंदे सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यावरून त्यांनी टिकास्त्र डागलंय.
पुजा चव्हाण च्या मृत्युला कारणीभूत असणार्या माजी मंत्री संजय राठोड ला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे
संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे माझा न्याय देवतेवर विश्वास लडेंगे….जितेंगे ? @CMOMaharashtra
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 9, 2022
काय आहे पूजा चव्हाण प्रकरण?
बीडमधील परळी येथील टिक टॉक स्टार पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केलेली. तिनं पुण्यात आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडालेली. तेव्हा तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूप्रकरणी गंभीर आरोप करण्यात आलेले होते. या आरोपानंतर संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. यावेळी पूजा चव्हाणच्या कॉल रेकॉर्डिंगही व्हायरल झाल्या होत्या. त्यातील आवाज संजय राठोड यांचा असल्याचा आरोप केला जात होता. यानंतर संजय राठोड कुटुंबासह नॉट रिचेबल झालेले. काही काळानंतर ते पुन्हा बंजारा समाजातील कार्यक्रमांमध्ये सक्रिय झाले. अखेरीस पुण्यातील वानवडी पोलिसांनी पूजा चव्हाण हिचा मृत्यू घातपात नसल्याचा खुलासा केला होता. पुजाचा अपघाती मृत्यू झाला असल्याचा खुलासा पोलिसांनी केल्यानंतर संजय राठोड यांना दिलासा मिळाला होता.