‘येऊन दाखवा’, नारायण राणे यांचं उद्धव ठाकरे यांना चॅलेंज, पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
बारसूत आंदोलक आक्रमक झाल्यानंतर आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेही बारसूत जाऊ शकतात, असं खासदार संजय राऊत म्हणाले. यावर केंद्रीय मंत्री नारायणराणे यांनी उद्धव ठाकरेंना इशारा दिला. बारसूत येऊन दाखवाच, असा इशारा नारायण राणेंनी दिलाय.
मुंबई : बारसूत रिफायनरीच्या विरोधावरुन आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाल्यानंतर आता ठाकरे गट आणि राणे कुटुंब आमनेसामने आले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख स्वत: उद्धव ठाकरेही बारसूला जावू शकतात, अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दिली. त्यानंतर हिंमत असेल तर या, असा दम देत भाजप नेते नारायण राणे यांनी पळवून लावण्याचा इशारा दिलाय. माती परीक्षण सुरु असताना, आंदोलक आक्रमक झाले आणि त्यानंतर पोलिसांसोबत संघर्ष झाला. त्याचवेळी लाठीचार्ज झाल्याचा आरोप ठाकरे गटानं केला. पण लाठीचार्ज झाला नाही, असं मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांनीही म्हटलंय. तर केंद्रीय मंत्री राणे म्हणतात की लाठीचार्ज नसून लाठीनं आंदोलकांना मागे ढकललं.
आंदोलकांसोबत झालेल्या संघर्षानंतर, पोलिसांनी काही आंदोलकांना अटक केली. त्यापैकी महिला आंदोलकांना पोलीस स्टेशनमध्येच टेबल जामीन मिळाला. तर 37 पुरुष आंदोलकांना न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर त्यांचीही जामिनावर सुटका झाली.
बारसूतल्या आंदोलनाची चर्चा जेवढी सुरु आहे तितकाच मुद्दा जमिनीवरुनही तापलाय. नाणारवरुन रिफायनरी बारसूत शिफ्ट होणार म्हणून आधीच अमराठी लोकांनी जमिनी खरेदी केल्यात. त्याची यादी ठाकरे गटानं सार्वजनिकही केलीय. ज्यात शहा, शर्मा, रेड्डी, मिश्रा, सिसोदिया, गुप्ता, झवेरी अशी आडनावं आहेत.
महाराष्ट्रात हे पहिल्यांदाच झालेलं नाही. याआधीही अनेक प्रकल्प झालेत त्यावेळीही प्रकल्पांआधी माहिती कुणकुण लागून परप्रांतियांनी जमिनी खरेदी केल्या आणि कोट्यवधी रुपये सरकारकडून वसूल केले. आताही 224 परप्रांतियांनी बारसूत जमिनी घेतल्याचा दावा होतोय.
संजय राऊत यांचा नारायण राणे यांना पलटवार
दरम्यान, नारायण राणे यांच्या इशाऱ्याला संजय राऊत यांनी कडक शब्दांत प्रत्युत्तर दिलंय. “नारायण राणे यांच्या बापाचं आहे का? इथे पाय ठेवू देणार नाही. तिथे पाय ठेवू देणार नाही. तुझे पाय कुठे आहेत ते बघ. अरे काय बोलताय तुम्ही, कुणाशी बोलताय? आपण केंद्रीय मंत्री आहात. आपण संयमाने बोला. पाय ठेवू देणार नाही, तुम्ही कोणाची दलाली करताय?”, असा सवाल त्यांनी केला.
“कोकणामध्ये आपण दोनवेळा पराभूत झाला आहात. लोकांनी आपल्याला पराभूत केलं आहे. लोकं निर्णय घेतील. मला कोणाविषयी व्यक्तिगत बोलायचं नाही. केंद्रीय मंत्री आहात प्रतिष्ठेत राहा, प्रतिष्ठा धुळीस मिळवू नका”, असा सल्ला संजय राऊतांनी दिला.