पाच राज्यांच्या निकालानंतर महाराष्ट्रातही हालचाली वाढल्या!
मुंबई : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपने सपाटून मार खाल्ला आणि मुख्य प्रतिस्पर्धी असणाऱ्या काँग्रेसने जोरदार कमबॅक केले आहे. त्यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. मोदीलाटेच्या जोरावर सत्तेचा विजयरथ कुणी रोखूच शकत नाही, अशा आवेशात असलेल्या भाजपला काँग्रेसने राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन […]
मुंबई : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपने सपाटून मार खाल्ला आणि मुख्य प्रतिस्पर्धी असणाऱ्या काँग्रेसने जोरदार कमबॅक केले आहे. त्यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. मोदीलाटेच्या जोरावर सत्तेचा विजयरथ कुणी रोखूच शकत नाही, अशा आवेशात असलेल्या भाजपला काँग्रेसने राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यात पाणी पाजलं. त्यामुळे आता भाजपशासित राज्यांमधीलही हालचाली वाढल्या आहेत.
महाराष्ट्रातील सर्व भाजप आमदारांची मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली!
महाराष्ट्रात शिवसेना-भाजपची सत्ता आहे. भाजपचे आमदार राज्यात सर्वाधिक आहे. शेतकरी, आरक्षण इत्यादी नाना प्रश्नांवरुन सध्या भाजपप्रणित राज्य सरकार अडचणीत सापडलं आहे. येत्या वर्षभरात निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आजूबाजूच्या राज्यांचा परिणाम आपल्या सत्तेवर होऊ नये म्हणून राज्यातही हालचाली वाढल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व भाजप आमदारांची मुंबईत बैठक बोलावली आहे. 19 डिसेंबर 2018 रोजी ही बैठक नियोजित असून, या बैठकीत भाजप आमदारांच्या कामाचा आढावा स्वत: मुख्यमंत्री घेणार आहेत.
दिल्लीतही खळबळ
पाच राज्यांच्या निकालानंतर आज दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी देशातील सर्व राज्यांमधील भाजपच्या प्रदेशाध्यक्षांची बैठक बोलावली होती. पाच राज्यांच्या निकालानंतर भाजपचे धाबे दणाणले असल्याचे बोलले जाते आहे. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील आजच्या बैठकीलाही विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.
पाच राज्यांचे निकाल लागले!
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल समोर आला असून, यातील राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसने विजय मिळवला आहे. तर मिझोरममध्ये एमएनएफ आणि तेलंगणात टीआरएसने विजय मिळवला आहे. पाचपैकी कुठल्याही राज्यात भाजप आपला झेंडा रोवू शकली नाही. त्यामुळे भाजपच्या विजयाचा रथ रोखण्यास काँग्रेससह प्रादेशिक पक्षांना यश आल्याचे राजकीय विश्लेषक बोलत आहेत.