Sanjay Raut : ‘ते मनाने कोलमडलेत’, खासदार संजय राऊत यांचा सामनातून खळबळजनक गौप्यस्फोट
Sanjay Raut : खासदार संजय राऊत हे नेहमीच राज्यातल्या देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारवर टीका करत असतात. आज संजय राऊत यांनी त्यांच्या सामनात प्रसिद्ध होणाऱ्या 'रोखठोक' या सदरातून काही खळबळजनक गौप्यस्फोट केले आहेत. आता या दाव्यांवर महायुतीकडून काय प्रतिक्रिया येते हे सुद्धा तितकच महत्त्वाच आहे.

खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या सामनातील ‘रोखठोक’ या सदरातून खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात विसंवाद आहे. त्यामुळे सरकारकडे मोठे बहुमत असूनही राज्य अस्थिर आहे असा दावा संजय राऊत यांनी त्यांच्या ‘रोखठोक’ या सदरातून केला आहे. “शिंदे हे स्वत:ला अपमानित केल्याच्या दु:खातून बाहेर पडायला तयार नाहीत. अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात शिंदे आणि फडणवीस यांची तोंडे दोन दिशांना होती. आता फडणवीस त्याचे उट्टे काढत आहेत. कारण शिंदे यांच्या हातात काहीच राहिलेले नाही” असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सध्या फारसे संबंध राहिलेले नाहीत असं सुद्धा या लेखात म्हटलं आहे.
शिंदे गटाचे एक आमदार विमान प्रवासात भेटले, त्यांनी दिलेल्या माहितीमुळे गोंधळ अजून वाढला असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. या आमदारासोबत जो संवाद झाला, तो संजय राऊत यांनी लेखात मांडला आहे.
संजय राऊत – “मुख्यमंत्रीपद पुन्हा मिळालेले नाही याच दुखवट्यात शिंदे अजून आहेत काय?”
आमदार – “ते त्याच्याही पलीकडच्या समाधी अवस्थेकडे पोहोचले आहेत. शून्यात गेले आहेत”
संजय राऊत – “शिंदे यांना धक्का बसला आहे काय?”
आमदार – “ते मनाने कोलमडले आहेत”
संजय राऊत – “का? काय झालं?”
“निवडणुका तुमच्यात नेतृत्वाखाली लढू व 2024 नंतरही पुन्हा तुम्हीच मुख्यमंत्री असाल, चिंता करु नका, निवडणुकीत सढळ हस्ताने खर्च करा, असं आश्वासन अमित शाह यांनी दिलं होतं. शिंदे यांनी प्रचंड पैसा निवडणुकीत टाकला. पण शाह यांनी दिलेलं आश्वासन पाळलं नाही. आपली फसवणूक झालीय असं शिंदे यांना वाटतय” असं या आमदाराने सांगितल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
‘फोन टॅप केले जात असल्याचा संशय’
“शिंदे व त्यांच्या लोकांचे फोन टॅप केले जातायत असं शिंदे यांना वाटतं. दिल्लीच्या एजन्सी हालचालींवर पाळत ठेऊन आहेत असा शिंदे यांना संशय आहे. पण शिंदे यांची पुरती कोंडी झाली आहे” असं या आमदाराने सांगितल्याच संजय राऊत म्हणालेत.