12 आमदारांची यादी निश्चित झाली? शिंदे-फडणवीसांमध्ये रात्री उशिरा तब्बल पावणे 2 तास चर्चा! वर्षावर खलबतं
Eknath Shinde Devendra Fadnavis Meet : 12 आमदारांच्या नियुक्तीची नवी यादी शिंदे-फडणवीस यांच्याकडून राज्यपालांना दिली जाणार आहे. या यादीमध्ये नेमका कुणाकुणाचा समावेश केला जातो? कुणाकुणाला आमदारकीची लॉटरी लागते? यावर अजूनही स्पष्टता आलेली नाही.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Ekanth Shinde Devendra Fadnavis Meeting) यांच्या रविवारी रात्री अचानक बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर दाखल झाले होते. रात्री तब्बल पावणे दोन तास शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये बैठक पार पडली. प्रभादेवीतील (Prabhadevi) राड्यानंतर मुंबईतील शिवसेना विरुद्ध शिंदे (Shivsena vs Shinde) गट हा संघर्ष ताणला गेला होता. त्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याबाबत शिंदे फडणवीस यांच्या चर्चा झाल्याची शक्यता आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा विषय असलेल्या 12 आमदारांच्या यादीबाबतही यावेळी चर्चा झाली असल्याचं बोललं जातंय.
आज मंत्रिमंडळ बैठक पार पडणार आहे. या मंत्रिमंडळ होणाऱ्या संभाव्य निर्णयाबाबतही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. नवीन 12 आमदारांच्या नियुक्तीबाबतही चर्चा होण्याची दाट शक्यता वर्तवली जातेय. अचानक रात्री उशिरा झालेल्या या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.
पाहा व्हिडीओ :
12 आमदारांच्या नियुक्तीची नवी यादी शिंदे-फडणवीस यांच्याकडून राज्यपालांना दिली जाणार आहे. या यादीमध्ये नेमका कुणाकुणाचा समावेश केला जातो? कुणाकुणाला आमदारकीची लॉटरी लागते? यावर अजूनही स्पष्टता आलेली नाही. राज्यपालांनी महाविकस आघाडीने दिलेल्या 12 आमदारांची यादी रद्द केल्यानंतर आता शिंदे फडणवीस कोणती 12 नावं आमदारकीच्या नियुक्तीसाठी पुढे देतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.
प्रभादेवीतील राड्यामुळे बैठक?
शनिवारी रात्री शिंदे गटाचे समर्थक संतोष तेलवणे यांना झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवरही शिंदे-फडणवीस बैठकीला महत्त्व प्राप्त झालं होतं. राज्यात शिंदे समर्थक विरुद्ध शिवसैनिक असा संघर्ष गणेशोत्सव मिरवणुकीपासूनच पाहायला मिळाला होता. त्यात शनिवारी ठिणगी पडली.
प्रभादेवीत शिंदे समर्थक विरुद्ध शिवसैनिक असा राडा झाला होता. या राड्यानंतर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी महत्त्वपूर्ण पावलं उचलण्याची गरज व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस भेटीत चर्चा झाली असल्याचीही शक्यता वर्तवली जातेय.