CM Eknath Shinde : बाळासाहेबांच्या आशीर्वादानेच आमचं सरकार; एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक, चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर शिवतीर्थावर जात बाळासाहेबांना वंदन केलं. त्यावेळी पाऊस सुरु होता, अशा स्थितीत भिजलेल्या अवस्थेत एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदारांनी बाळासाहेबांना वंदन केलं.
मुंबई : शिंदे सरकारनं आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. 164 विरुद्ध 99 अशा बहुमतानं शिंदे सरकारनं विश्वासदर्शक प्रस्ताव जिंकलाय. सरकार स्थापन झाल्यानंतर आपण हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृतीस्थळावर जात बाळासाहेबांचे आशीर्वाद घेणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं होतं. त्यानुसार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर शिवतीर्थावर जात बाळासाहेबांना वंदन केलं. त्यावेळी पाऊस सुरु होता, अशा स्थितीत भिजलेल्या अवस्थेत एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदारांनी बाळासाहेबांना वंदन केलं. तत्पूर्वी मुख्यमंत्री शिंदे चैत्यभूमीवरही गेले. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांना एकनाथ शिंदे आणि सोबतच्या आमदारांनी अभिवादन केलं.
‘आज बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं सरकार आलं’
आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव 164 विरुद्ध 99 अशा बहुमताने पास झालाय. म्हणून आम्ही बाळासाहेबांचं दर्शन घ्यायला आलोय. स्मारकावर बाळासाहेबांना अभिवादन केलं. हे सरकार बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं आलंय. बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार या राज्याला पुढे नेणार आहेत. म्हणून आज बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं सरकार, शिवेसना-भाजपचं सरकार आज स्थापन झालं आहे. या राज्यात सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी होईल. शेतकरी असतील, कष्टकरी असतील, कामगार असतील, समाजातील सर्व घटक असतील, त्यांना न्याय देण्याचं काम हे सरकार करेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना दिली.
This govt came into power by winning the trust vote with a thumping majority of 164-99 margin, due to the blessings of Balasaheb Thackeray. All of our Shiv Sena MLAs are here at the Balasaheb Thackeray memorial for the same: Maharashtra CM Eknath Shinde, in Mumbai’s Shivaji park pic.twitter.com/CNIWrCB0iX
— ANI (@ANI) July 4, 2022
भर पावसात सर्व आमदारांसह बाळासाहेबांना वंदन
आज सभागृहात विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर रात्री साडे सात वाजता एकनाथ शिंदे काही आमदारांसह छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर दाखल झाले. त्यावेळी जोरदार पाऊस सुरु होता. अशावेळी पावसात भिजत एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं. शिंदे यांनी स्मृतीस्थळावर डोकं टेकवत बाळासाहेबांना अभिवादन केलं.
महामानवालाही अभिवादन
तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुतात्मा चौकातील स्मारकावर जात महाराष्ट्राच्या निर्मिती लढ्यात बलिदान देणाऱ्या 106 हुतात्म्यांना अभिवादन केलं. तसंच चैत्यभूमीवर जात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांनी अभिवादन केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सायंकाळी हुतात्मा चौक येथे अभिवादन केले pic.twitter.com/V8Tqw2J9mu
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 4, 2022