‘जोडे पुसणारे…’, उद्धव ठाकरे यांची खोचक टीका एकनाथ शिंदे यांच्या जिव्हारी, दिलं सडेतोड उत्तर
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या 'जोडे पुसणारे राज्य करत आहेत' हे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या चांगल्याच जिव्हारी लागलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवर अतिशय खोचक शब्दांत उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबई : “जोडे पुसायची लायकी असणारे राज्य करत आहेत. महाराष्ट्राचं होणार काय? मी मुख्यमंत्री म्हणून मला जे काही शक्य होतं ते मी केलं. ज्या पद्धतीने पाठीत वार करुन सरकार पाडलं त्याचा सूड आणि बदला घेणारच”, असा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. त्यांच्या या टीकेला सडेतोड उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमधून दिलं आहे. “केवळ कुटुंबापुरता विचार करून आणि हपापलेपणाचा चष्मा घालून वावरणारी ही माणसे आहेत. ‘धनसेवा हीच ईश्वरसेवा’ ही यांची वृत्ती आहे. परंतु, संधी मिळेल तेव्हा ही तळागाळातील सामान्य माणसे या लोकांना मतदानातून जोडे मारतील”, असं जोरदार प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं.
“काहीही श्रम न करता पैसा आणि पद मिळाले की माणसांचा मेंदू काम करेनासा होतो. कष्टकरी, श्रमजीवी यांच्याविषयी त्यांच्या मनात आस्था राहत नाही. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली माणसे तळागाळातल्या लोकांना, त्यांच्या कामाला तुच्छ लेखतात. दुसऱ्यांना कायम हीन लेखण्यात, त्यांचा द्वेष करण्यात त्यांचे आयुष्य जाते. म्हणूनच त्यांना जोडे पुसणारी व्यक्ती कमी दर्जाची वाटते आणि त्यांचा ते अपमान करतात”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“जोडे पुसणारे गरीब असतील. पण ते तुमच्यापेक्षा कदाचित जास्त प्रामाणिक असतात. कारण ते स्वतःच्या मेहनतीची भाकर खातात. ते विश्वासघातकी नसतात. चहावाला, रिक्षावाला, टपरीवाला, वॉचमन हे समाजघटक नेतृत्वही करू शकतात, हेच ज्यांच्या पचनी पडत नाही, त्यांना कायम पोटदुखी जडलेली असते. वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या मारायलाही ज्यांना धड जमत नाही त्यांच्या पात्रतेबाबत काही न बोललेलेच बरे”, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
‘सर्वसामान्य माणसं नेतृत्व करायला लागतात तेव्हा…’
एकनाथ शिंदे यांनी ट्विट केल्यानंतर ‘टीव्ही 9 मराठी’ला देखील प्रतिक्रिया दिली. “2019 ला जोडे पुसायला कोण गेलं होतं? जोडे पुसायला गेले होते की जोडे धुवायला गेले होते? हे लोकांना माहिती आहे. हे सर्वसामान्याबद्द द्वेष, मस्तर आहे. चहावाला, टपरीवाला, रिक्षावाला, भाजीवाला हे सर्वसामान्य माणसं नेतृत्व करायला लागतात तेव्हा लागतात तेव्हा अशाप्रकारची पोटदुखी होते. सर्वसामान्य माणूस हा जोडे पुसरणारा मेहनती, प्रामाणिक असतो. तुमच्यासारखा विश्वासघातकी नसतो. त्यामुळे अशाप्रकारचा माजोरडापणा करणाऱ्यांना जनता नक्कीत मतदानातून देईल”, असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिलं.
काहीही श्रम न करता पैसा आणि पद मिळाले की माणसांचा मेंदू काम करेनासा होतो. कष्टकरी, श्रमजीवी यांच्याविषयी त्यांच्या मनात आस्था राहत नाही. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली माणसे तळागाळातल्या लोकांना, त्यांच्या कामाला तुच्छ लेखतात. दुसऱ्यांना कायम हीन लेखण्यात, त्यांचा द्वेष…
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 27, 2023
“उद्धव ठाकरे यांनी बारसू प्रकल्पासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं. पण मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर तात्काळ भूमिका बदलली. याच्यामागचं कारणल काय याचा जनतेने शोध घेतला पाहिजे. ही दुटप्पीपणाची भूमिका आहे. ही भूमिका वारंवार घेतली जाते. समृद्धी हायवेच्या बद्दलही अशीच भूमिका होती. पण त्याला गेमचेंजर प्रकल्प आम्ही केला. त्याला बाळासाहेब ठाकरे यांचं नावही दिलं. बारसूचा प्रकल्प सर्वसामान्यांना विश्वासात घेऊनच नागरिकांच्या हितासाठी केला जाईल”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
दीपक केसरकर यांच्याकडूनही प्रत्युत्तर
दरम्यान, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी देखील उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. “जोडे पुसून घेणं हे सरंजाम शाहीचं लक्षण आहे. तुमच्याबद्दल आदर आहे. याचा अर्थ तुम्ही वाट्टेल ते बोलले आणि भडकवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही लोकांना कितीवेळा भडकवाल ते महाराष्ट्राला समजावून सांगावं लागेल”, असं दीपक केसरकर म्हणाले.