“लक्ष असतं आमचं! चुकीचे निर्णय घ्याल तर याद राखा”, नव्या मंत्र्यांना मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा दम…
नुकताच मंत्रिमंडळ विस्तार झालाय. या नव्या मंत्र्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच सावधानतेचा इशारा दिला आहे.
मुंबई : नुकताच मंत्रिमंडळ विस्तार झालाय. जुन्याच चेहऱ्यांना नव्याने संधी देण्यात आली आहे. या नव्या मंत्र्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच सावधानतेचा इशारा दिला आहे. “चांगला कारभार करा. तुमच्यावर आमची नजर आहे हे लक्षात ठेवा. चुकीचे निर्णय घेतले तर तुमचे समर्थन करणार नाही. मंत्र्यांनी एकमेकांवर टीका केली तर याद राखा”, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सर्व नव्या मंत्र्यांना मंत्रालयातील बैठकीत दम भरला असल्याची माहिती आहे. लक्ष आहे आमचं, असं म्हणत त्यांनी मंत्र्यांना इशारा दिलाय. मंत्रिमंडळ बैठकीनंतर अधिकाऱ्यांना सभागृहातून बाहेर जाण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आणि शिंदे गटातील मंत्र्यांचं (New Minister) ‘बौद्धिक’ घेतलं.
शिंदे गटातल्या मंत्र्यांना तर चांगलीच तंबी दिल्याची माहिती आहे. शिंदे गट व भाजपचे नवनिर्वाचित मंत्री आणि मंत्रीपदावर वर्णी न लागल्यामुळे नाराज झालेल्यांमधील मतभेद कोणत्याही क्षणी बाहेर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतभेद आणि परस्परांवर टीका करणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला. यामुळे नव्या सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या बैठकीला नवनिर्वाचित मंत्री सुधीर मुनगंटीवार वगळता सर्व नवीन मंत्री उपस्थित होते. सर्वांना जबाबदारीने वागण्याचा सल्ला देण्यात आला. त्याचवेळेस चुकीचे निर्णय घेणाऱ्यांची बाजू घेतली जाणार नाही. तुमच्या चुकांवर पांघरूण घातले जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला.
केंद्र सरकारच्या ताकदीमुळे राज्यात नवे सरकार स्थापन झाल्याची जाणीव या बैठकीत सर्व मंत्र्यांना करून देण्यात आली. केंद्रांच्या योजनांच्या अंमलबजावणीची आठवणही करून देण्यात आली. केंद्र सरकारने राज्याला मागील अडीच वर्षांत केंद्रीय योजनांबाबत स्मरणपत्रे पाठवली, पण योजनांची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे केंद्राच्या योजनांची राज्यात अंमलबजावणी करून महाराष्ट्र राज्य केंद्र सरकारसोबत आहे, हे आपल्याला केंद्राला दाखवून द्यायचं आहे, असंही या बैठकीत सांगण्यात आल्याची माहिती आहे.