अक्षय कुडकेलवार, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : गेल्या वर्षभरापासून शिंदे गटातील आणि भाजपचे अनेक आमदार मंत्रिपदाकडे आस लावून आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला संधी मिळेल अशी आशा त्यांना वाटत आहे. सत्ताधाऱ्यांकडूनही वारंवार मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचं सांगितलं जात आहे. पण प्रत्यक्षात विस्तार काही होताना दिसत नाही. या आठवड्यात विस्तार होईल असं सांगितलं जात असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड केलं आणि सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. त्यामुळे आपल्याला मंत्रिपदाची हुलकावणी मिळते की काय असं शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांना वाटत आहे. या आमदारांच्या मनात शंकेची पाल चुकचुकलेली असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून मोठं विधान केलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार एका आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे इच्छुक आमदारांना दिलासा मिळाला आहे. इच्छुकांचा या विस्तारात समावेश केला जाणार असल्याचंही शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता मंत्रीपद मिळावं म्हणून इच्छुकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. असं असलं तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात कुणाचा समावेश करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर भाजपकडून नव्या विस्तारात कुणाला संधी मिळते हे पाहणेही औत्सुक्याचं ठरणार आहे.
भाजपने आधी शिवसेना फोडली. त्यानंतर राष्ट्रवादीही फोडली. आता काँग्रेस फुटणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याबाबत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच सवाल केला. काँग्रेसवाल्यांना सोबत घेणार का? असा सवाल मुख्यमंत्र्यांना करण्यात आला. त्यावर आता जागा फूल झाली आहे, असं उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. अजित पवार यांनी विकासाला साथ दिली आहे. त्यामुळेच ते आमच्यासोबत आले आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मी आनंद दिघे यांच्या आशीर्वादने काम करत आहे. त्यांच्याच आदर्श मार्गावर माझी वाटचाल सुरू आहे. राज्यात एक वर्षात पहिल्या दिवसापासून मी लोकहिताचे निर्णय घेतले आहेत. कुठलाही वैयक्तिक निर्णय घेतला नाही. शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब आणि विद्यार्थी आदी घटकांना न्याय देणारे निर्णय घेतले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच जनतेचा आमच्यावरील विश्वास वाढला आहे, असं त्यांनी सांगितलं.