ठाणे: खाते वाटपानंतर शिंदे सरकारमधील अनेक मंत्री नाराज आहेत. महत्त्वाची आणि अपेक्षित खाती न मिळाल्याने या मंत्र्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शेवटी खातं कोणतं आहे यापेक्षा या खात्याला आपण न्याय कसा देतो हे महत्त्वाचं आहे. ज्या ज्या विभागाची जबाबदारी ज्या ज्या मंत्र्यांवर दिलीय ते नक्कीच ती जबाबदारी यशस्वी पार पाडतील. या महाराष्ट्रातील (maharashtra) जनतेला न्याय देतील. एकदा मंत्री झाल्यानंतर तो एका विशिष्ट भागाचा मंत्री (minister) नसतो तर संपूर्ण राज्याचा मंत्री असतो. त्यामुळे राज्यभर आमच्या मंत्र्यांच्या माध्यमातून विकास केला जाईल. सामान्य लोकांना न्याय दिला जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
दरम्यान, आज मंत्रालयात भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यापूर्वी ठाण्यात आले असता मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. दरम्यान, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शिंदे यांनी राज्याला उद्देशून भाषण केलं. यावेळी त्यांनी राज्याला विकासाकडे नेण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला. महाराष्ट्राला देशात अग्रेसर राज्य बनविण्याच्या दिशेने आपण आता वाटचाल सुरू केली आहे. आपण सर्वजण मिळून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशाला आणि राज्याला प्रगतीपथावर नेण्याची शपथ घेऊया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले.
गेल्या अडीच – पावणे तीन वर्षात कोविडच्या भयंकर विषाणूने आपल्याला बंदिस्त केले होते. आज संकट पूर्णपणे गेलेले नाही. पण या विषाणूने घातलेल्या बेड्या आपण सगळ्यांनी तोडल्या आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण उत्साहाने साजरा करतो आहोत. तसेच येणारा गणेशोत्सव, दहीहंडी किंवा इतर धार्मिक सण देखील आपण नेहमीप्रमाणे काळजी घेऊन पण जल्लोषात साजरे करणार आहोत, असं त्यांनी सांगितलं. आज कोरोनाचे संकट पूर्णपणे गेलेले नाही. कोविडचा बूस्टर डोस मोफत देण्यात येत आहे. त्यामुळे हयगय करू नका. कोविड लसीमुळे या जीवघेण्या संकटातून संरक्षण मिळते आहे हे कृपया लक्षात घ्या, असे आवाहनही त्यांनी केलं.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आपले राज्य आज पूर्णपणे तिरंग्यात न्हाऊन निघाले आहे. घरोघरी तिरंगा दिसतो आहे. मुख्य म्हणजे नागरिकांनी स्वत: उत्स्फूर्तपणे यात भाग घेतला आहे. राज्यात नवे सरकार स्थापन झाले आहे. अगदी पहिल्या दिवसापासून आम्ही कामाला सुरुवात केली आहे. आमचे पहिले प्राधान्य सर्वसामान्य माणूस, शेतकरी, शेतमजूर, दीनदुबळे घटक आहेत, असे ते म्हणाले.
पूर, अतिवृष्टी यावर कायमस्वरूपी आणि शाश्वत उपाय करण्यासाठी आम्ही जलसंपदा विभागामार्फत नद्यांचे खोलीकरण, गाळ काढणे यासाठी शास्त्रशुद्ध कार्यक्रम तयार करीत आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.
ओबीसी, मराठा, धनगर समाज यांना आरक्षणाचे फायदे मिळवून देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. बांठिया आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारल्याने ओबीसी समाजाला दिलासा मिळाला आहे. ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळाले आहे. सारथी आणि महाज्योती या संस्थांना आम्ही बळकट करीत आहोत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी ‘अमृत’या संस्थेला देखील उभारी देण्यात येत आहे, असंही ते म्हणाले.