Sanjay Raut : एकनाथ शिंदेंवर कोणता दबाव आहे हे मला माहीत आहे, त्या 40मध्ये अनेक खोतकर; राऊतांचा दावा
Sanjay Raut : उद्धव ठाकरे मनापासून भाजपपासून दूर गेले नाहीत. 2014 साली सुद्धा. भाजपनेच आम्हाला सोडलं. 2019साली भाजपच्या प्रवृत्ती आणि वृत्तीमुळेच आम्हाला भाजपपासून दूर जावं लागलं. जे भाजपचं भजन करत आहेत, त्यांना हे सर्व माहीत आहे.
मुंबई: बंडखोरांसोबत आमचे कोणतेही मतभेद नाहीत. मतभेद नसून दहशत आहे. केंद्रीय तपास यंत्रणेची. अनेक इतर गोष्टी त्यात आहे. एक दहशत आहे. अर्जुन खोतकरांचं (arjun khotkar) विधान तुम्ही ऐकलं असेल. असे अनेक खोतकर त्या 40मध्ये आहेत आणि दिल्लीतील 12मध्ये आहेत. शिंदेवर कोणता दबाव आहे. मला माहीत आहे, असा दावा करतानाच खोतकरांचं अभिनंदन करतो. त्यांच्यावर दबाव आहे हे त्यांनी दिल्लीत येऊन मोकळेपणाने सांगितलं. कोणत्या तणावाखाली आहे हे त्यांनी सांगितलं. या मोकळ्या भूमिकेचं स्वागत करतो, असं शिवसेना (shivsena) नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत (sanjay raut) हे टीव्ही9 मराठीशी बोलत होते. सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे. उद्धव ठाकरे आपले नेते आहेत आणि पक्ष आपला आहे. पक्षात आपण निर्णय घेतला पाहिजे. बोललं पाहिजे. ही माझी आणि सर्वांचीच भूमिका आहे, असं राऊत यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरे मनापासून भाजपपासून दूर गेले नाहीत. 2014 साली सुद्धा. भाजपनेच आम्हाला सोडलं. 2019साली भाजपच्या प्रवृत्ती आणि वृत्तीमुळेच आम्हाला भाजपपासून दूर जावं लागलं. जे भाजपचं भजन करत आहेत, त्यांना हे सर्व माहीत आहे. ही काही मुद्दाम झालेली गोष्ट नाही. ती आमच्यावर लादली गेली आहे, असं संजय राऊत म्हणाले.
आता सरकार आलं ते कोणतं फिक्सिंग?
उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खिल्ली उडवली होती. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आता सरकार आलं ते कोणतं फिक्सिंग आहे? काय आहे? त्यांना जे बोलायचं ते बोलू द्या. उद्धव ठाकरेंना मी राजकीय प्रश्न विचारले जे लोकांच्या मनात आहेत. तुम्ही आंबे चोखून खाता की कापून खाता? असे प्रश्न विचारले नाहीत. राजकीय मुलाखत आहेत. राजकीय प्रश्न विचारले जातील. या प्रश्नांची टोकदार उत्तरं विरोधकांना खुपत असतील, ते तळमळत असतील तर या मुलाखतीचा उद्देश सफल झाला असं मला वाटतं, असं त्यांनी सांगितलं.
ते भाजपचा अजेंडा राबवताहेत
भाजपने सध्या माझ्याबाबत बोलायचं कमी केलं आहे. जे पक्षात सक्रिय असतात, जे आपल्या नेत्यांचे कवचकुंडले बनून उभे असतात त्यांच्यावर असे हल्ले होत असतात. माझ्यावर हल्ले झाले. जे सोडून गेले. त्यांच्याशी व्यक्तिगत शत्रूत्व नाही. शिंदेपासून इतर आमदारांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मैत्रीचं नातं आहे. सोडून गेल्यामुळे त्यांना कुणावर तरी हल्ला करावा लागेल. मग आदित्य ठाकरेंवर करतील. राऊतांवर करतील. भविष्यात उद्धव ठाकरेंवर करतील. ते भाजपचा अजेंडा राबवत आहेत. त्यांचा नाही. त्यांच्याशी खासगीत बोलला तर ते आमच्याविषयी चांगले बोलतील. मी तर सरकारमध्ये नव्हतो. मी फक्त संघटनेचं काम करत होतो, असंही त्यांनी सांगितलं.