मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी राज्यात सत्ता स्थापण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या भेटी घेतल्या होत्या. खुद्द एकनाथ शिंदे यांनीच विधानसभेत याबाबतचा गौप्यस्फोट केला. सर्व आमदार झोपल्यानंतर आपण शिंदे यांना कसे मध्यरात्री भेटून चर्चा करत होतो, असा किस्साच शिंदे यांनी ऐकवला होता. मात्र, शिंदे यांच्या या मध्यरात्रीच्या भेटीगाठी काही थांबलेल्या नाहीत. शिंदे यांनी बुधवारी मध्यरात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (amit shah) यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर या भेटीत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. विशे, म्हणजे शिंदे हे एकटेच अमित शहा यांच्या भेटीला गेले होते. भाजपच्या एकाही नेत्याला ते सोबत घेऊन गेले नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही ते सोबत घेऊन गेले नाहीत. विशेष म्हणजे भाजपच्या नेत्यांनाही या भेटीची कानोकान खबर नसल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, या भेटीबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने अद्याप दुजोरा दिलेला नाही.
राज्यात नवं सरकार स्थापन होऊन एक महिना लोटला तरी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आलेला नाही. केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच राज्याचा गाडा हाकत आहेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्र्यांनाही कोणतीही खाती देण्यात आलेली नाहीत. दोघेच कॅबिनेटची दर आठवड्याला बैठक घेतात आणि निर्णय जाहीर करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तेत आल्यापासून पाचवेळा दिल्लीत गेले. यावेळी त्यांनी अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही गाठीभेटी घेतल्या. पण मंत्रिमंडळाचं घोडं काही पुढे गेलं नव्हतं. त्यातच आता मुख्यमंत्री शिंदे हे अमित शहांना बुधवारी मध्यरात्री भेटल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
बुधवारी मध्यरात्री शिंदे एकटेच अमित शहांना भेटल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्यासोबत भाजपचा एकही नेता नव्हता. किंवा त्यांच्या गटातील एकही आमदार नव्हता. देवेंद्र फडणवीसही त्यांच्यासोबत नव्हते. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शिंदे यांना एकट्यालाच शहा यांनी भेट दिल्याने या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. तर दुसरीकडे शहा हे एकट्या शिंदेंनाच भेटल्याने भाजपचे नेतेही टेन्शनमध्ये आल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, भाजपचे आमदार आणि फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी गिरीश महाजन दिल्लीत आहेत. त्यांनी अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी मंत्रिमंडळ विस्तार आणि राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.
>> 8 जुलै रोजी पहिली दिल्लीवारी
>> 19 जुलै खासदारांना दिल्लीत भेटले
>> 22 जुलै रोजी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या समारोपाच्या पार्टीला हजेरी
>> 24 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी
>> 27 जुलै अमित शहा यांची मध्यरात्री भेट