“आता मुख्यमंत्री शाळेत पहारा देणार का?” शिंदे गटाच्या आमदाराचे वादग्रस्त विधान, म्हणाला “आरोपी बलात्कार करतोय हे…”
नुकतंच एका पत्रकार परिषदेत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना बदलापूर प्रकरणावरुन प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी वादग्रस्त विधान केले.

Sanjay Gaikwad Controversial Statement : बदलापुरातील शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर महाराष्ट्रात संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. याप्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेंला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यातच आता शिंदे गटाच्या एका आमदाराने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आता मुख्यमंत्री शाळेत पहारा देणार का? की आरोपी सांगणार की चल मी बलात्कार करतोय, मला पकडायला ये? असे विधान शिंदे गटाच्या एका आमदाराने केले आहे. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
बदलापुरात झालेल्या त्या अत्याचाराच्या घटनेनंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. आता नुकतंच एका पत्रकार परिषदेत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना बदलापूर प्रकरणावरुन प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी वादग्रस्त विधान केले.
संजय गायकवाड काय म्हणाले?
”काल मी आंदोलन पाहिलं, सगळे पक्ष त्यात थयथयाट करत होते. ही एक प्रवृत्ती असते त्यांना मुलीचं वय देखील कळत नाही. ते अत्याचार करतात. आता सर्व विरोधक सरकार सरकार करत आहेत. पण आता मुख्यमंत्री काय शाळेत जाऊन पाहारा देणार आहेत का? महाराष्ट्राचे एसपी (पोलीस निरीक्षक) हे त्यांच्या घरी जाऊन बसणार आहेत का? किंवा मग आरोपी सांगतो की मी बलात्कार करतोय, मला पकडायला ये? असं ते सांगतात का? या घटना घडत असतात, त्याच्यासाठी यंत्रणा आहे. पोलीस यंत्रणा काम करते. पोलिसांकडून नाही झालं तर सीबीआयवाले करतात. सीबीआयकडून नाही झालं तर एसआयटी करते, पण आरोपीला सोडत नाही. त्यामुळे अशा घटनांचे राजकारण करण्यापेक्षा या नराधमांना कशी शिक्षा मिळेल हे प्रयत्न सगळ्यांनी केले पाहिजे. ते प्रयत्न महाराष्ट्रात होताना दिसत नाही, असे विधान संजय गायकवाड यांनी केले.
संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानाचा व्हिडीओ काही मिनिटातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. या विधानांमुळे संजय गायकवाड यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या या वक्तव्याला अनेकांनी ‘असंवेदनशील’ असे म्हटले आहे. संजय गायकवाड यांच्या वक्तव्यानंतर अनेकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गायकवाड यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
बदलापुरातील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाला. या घटनेमुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास 12 तास उशीर केल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेचे तीव्र पडसाद बदलापुरात उमटताना दिसत आहेत. याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर शाळेच्या मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणात वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेतील एसआयटी गठीत करण्यात आली आहे. तसेच, कर्तव्यात कसूर करणार्या तीन पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेत जलदगती न्यायालयात खटला चालवण्यात येणार आहे.
बदलापुरा झालेल्या लैंगिक अत्याचार घटनेतील मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तर दुसरीकडे बदलापूर स्थानकात आंदोलन करणाऱ्या 22 आंदोलकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.