मिलिंद नार्वेकर शिंदे गटात येणार का?; खुद्द मुख्यमंत्रीच म्हणाले…
आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जात आहोत. आमच्यासोबत संपूर्ण शिवसेना आहे, हे अख्ख्या जगाने पाहिले आहे.
गिरीश गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पनवेल: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांचे राईट हँड मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटात येण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी तर मिलिंद नार्वेकर शिंदे (milind narvekar) गटाच्या वाटेवर असल्याचं सांगून या चर्चेला खतपाणी घातलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही (cm eknath shinde) प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मिलिंद नार्वेकर आमच्याकडे येणार की नाही माहीत नाही. आज माझा वेगळा मूड आहे. मी काहीही लपवून ठेवत नाही. माझे जे आहे, ते सगळं उघडं आहे, असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. शिंदे यांनी स्पष्ट काहीच न सांगितल्याने नार्वेकरांच्या शिंदे गटातील प्रवेशावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पनवेलमधील एका शाळेत आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5जी सेवेचं लोकार्पण करण्यात आलं. त्यावरही मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. देशासाठी आज महत्वाचा दिवस आहे. 5G मुळे देशात मोठी क्रांती होणार आहे. या 5जी सेवेत मुंबई, पुणे आणि पनवेलचा समावेश करण्यात आला. त्याचा आनंद आहे. त्याबद्दल मोदींचा आभारी आहे. या सेवेमुळे शिक्षकांना चांगला फायदा होणार आहे. आता सर्वच क्षेत्रात 5जीचं महत्त्व असणार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
राज्याची आर्थव्यवस्था 1 ट्रिलियनकडे न्यायची आहे. मुलं हुशार आहेत. त्यांना माहीत आहे 5G काय आहे. त्यांना हे सर्व माहीत आहे. त्यामुळे त्यांना याबद्दल फार उत्सुकता आहे. पूर्वी ज्या अडचणी होत्या, त्या आता राहणार नाही. ग्रामीण भागातही या सेवेचा चांगला उपयोग होणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
आज शाळेतील विद्यार्थ्याबरोबर बसण्याचा एक वेगळा अनुभव आला. ही शाळा आता डिजिटल होणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
यावेळी त्यांनी दसरा मेळाव्यावरही भाष्य केलं. दसरा मेळाव्याची सभा अभूतपूर्व होणार आहे. आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जात आहोत. आमच्यासोबत संपूर्ण शिवसेना आहे, हे अख्ख्या जगाने पाहिले आहे. आमच्या भूमिकेला जनतेने प्रतिसाद आणि प्रेम दिले आहे, असंही त्यांनी सांगितलं.