मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेना (Shiv Sena) पक्षाचे सर्व मंत्री आणि आमदार आज अयोध्या दौऱ्यासाठी रवाना होत आहेत. सर्व आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मुंबई विमानतळावरुन लखनौच्या दिशेला रवाना होतील. त्यासाठी सर्व आमदार आज दुपारी विमानतळावर दाखल झाले. यावेळी आमदारांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर गेल्यावर्षी गेले तेव्हा ऐनवेळी शिवसेनेच्या आमदारांचा अयोध्या दौरा रद्द झालेला. त्यांना विमानतळावरुन परतावं लागलेलं. तीच सल आजही शिवसेना आमदारांच्या मनाला टोचत असल्याचं आज बघायला मिळालं. मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबतचा उल्लेख केला. तर शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला. आमदारांमध्ये अयोध्याला जाण्यासाठी उत्साह आहे, त्यांची भक्तीदेखील आहे. पण भूतकाळातील घटनांची सल त्यांच्या चेहऱ्यावर निश्चितच दिसतेय.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अयोध्या दौरा हा प्रसिद्धीसाठी आहे, अशी टीका केली. पण त्यावर शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं. “ते कधी अयोध्येला गेले नसतील. आम्ही शिवसैनिक आहोत. बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं की, अयोध्येला राम मंदिर झालं पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंनी त्यासाठी लढा देखील उभा केला होता. आज बाळासाहेबांचं स्वप्न पूर्णत्वास साकारलं जातंय. आज राम मंदिर यांचं स्वप्न पूर्ण होतंय. अयोध्येला प्रभू रामचंद्रांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही चाललो आहोत”, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली.
“याअगोदर गेल्यावर्षी आम्ही अयोध्येला निघालो होतो. विमानतळावर आलो. आमचे बोर्डिंग पासही आले होते. पण त्यावेळी आम्हाला अचानक वरुन आदेश आले की, परत या. त्यामुळे आमचा तो दौरा अर्धवट राहिला होता. विमानतळावरुन अयोध्येला जाण्याऐवजी आम्हाला माघारी गावाकडे जावं लागलं. त्यामुळे आम्ही सर्वांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आग्रह धरला होता की, त्यावेळी आमचा दौरा होऊ शकला नाही. तो दौरा आता करुया. त्यामुळे सर्व आमदारांच्या आग्रहामुळे आम्ही सर्वजण प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादासाठी जात आहोत”, असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं.
“आदित्य ठाकरे यांच्या हातात टीका करण्याशिवाय दुसरं काय आहे? त्यांना चांगल्या गोष्टी कधीही बोलता येत नाही. कुणी कितीही चांगलं काम केलं तरी टीका करायची, या व्यतिरिक्त त्यांना काही येत नाही. त्यांना त्यांची टीका करु द्या. आम्ही निश्चितपणे गेल्या आठ महिन्यांमध्ये जे चांगलं काम केलं आहे ते महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिलं आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या दोन टप्प्यात निवडणुका पार पडल्या आहेत. जनेतेने चांगली मतं दिली आहेत”, असा दावा शंभूराज देसाई यांनी केला.
यावेळी रामदास कदम यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. “एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हातून चांगलं काम व्हावं म्हणून प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद घेण्यासाठी चाललो आहोत. आता चोर कोण ते लवकरच स्पष्ट होईल. लवकरच दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. आमची मंत्रीपदं आणि आमदारक्या कोणी चोरल्या ते मातोश्रीमध्येच बसले आहेत ना! सौ चूहे खाके बिल्ली हज चली, खोटं बोल पण रेटून बोलं असा महाराष्ट्रात सुरु आहे. म्हणूनच अयोध्या दौऱ्याचं नियोजन केलं आहे”, असं रामदास कदम म्हणाले.
दरम्यान आमदार संदीपान भुमरे यांनीदेखील यावेळी प्रतिक्रिया दिली. “बाळासाहेब हे आमचे आहेत. त्यामुळे धनु्ष्यबाण चोरीचा काही विषयच नाही. बाळासाहेब आणि धनुष्यबाण आमचा आहे. त्यामुळे चोरीचा काही प्रश्नच येत नाही”, असं संदीपान भुमरे म्हणाले.