अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पातून अनेक महत्त्वाच्या योजना जाहीर केल्या होत्या. त्यावर शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी टीका केली होती. आजचं बजेट म्हणजे चादर लगी फटने और खैरात लगी बटने, अशी टीका जयंत पाटील यांनी केली होती. जयंत पाटील यांच्या टीकेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरपूस समाचार घेतला. जयंतराव काय म्हणाले, लोकसभा में चादर फट गयी. अरे पण फाटली कुणाची? मोदी तर पंतप्रधान बनले. तुम्ही जंग जंग पछाडलं. पण मोदींना हटवू शकले नाही, असा टोला लगावतानाच अरे ये हरलेले लोक पेढे वाटतात वेड्यासारखे. तुम्ही कशाला पेढे वाटता? विरोधी पक्षनेतेपद मिळालं म्हणून? विजयराव (वडेट्टीवार) जरा त्यांना समजवा, असा जोरदार हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्राचं दर्शन घडवून आणण्यासाठीची सरकारने योजना जाहीर करावी, अशी मागणी करणारी लक्ष्यवेधी आज विधानसभेत मांडली होती. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. आम्ही काल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू केली. त्याचा जीआरही काढला आहे. अजितदादा का वादा पक्का है, आम्ही दूध का दूथ आणि पानी का पानी इथेच केलंय, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
काल आम्ही भगिनी, ज्येष्ठ नागरिक, मुलांसाठी, वारकऱ्यांसाठी योजना आणल्या. काल मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली. तुमचे चेहरे पांढरे फटक झाले होते. अर्थसंकल्प झाल्यावर विरोधकांनी पत्रकार परिषद घेतली. तिथे विजय वडेट्टीवार नव्हते. कारण सरकार देणारं आहे. त्यांच्याविरोधात कसं बोलणार असं त्यांना वाटलं म्हणून ते गेले नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. लोकसभा निवडणुकीत त्यांनी खोटं नरेटीव्ह पसरवला. त्यांना वाटलं आता विधानसभा जिंकलीच म्हणून समजा. पण कालच्या अर्थसंकल्पामुळे त्यांचा सुपडा साफ झाला होता. आमच्या घोषणानंतर विरोधक हतबल झाले, असंही ते म्हणाले.
तुम्ही खोटे नरेटीव्ह सेट केले. तुम्ही एवढं करूनही मोदींना पंतप्रधान पदापासून रोखू शकले का? अरे ज्यांची खोटं बोलून मते घेतली ना, ते आता आमच्याकडे आलेत. म्हणाले गलती हो गयी है हमारी. आलेत. कोण कुठून येतात हे तुम्हाला माहीत आहे. मी कधीच खोटं बोलत नाही. मी जे करतो ते उघड करतो. लपूनछपून काहीच करत नाही.. माझं काम सर्वांना माहीत आहे. मी दोन वर्षापूर्वी जे केलं, त्याचा परिणामही दिसत आहेत, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावला.