‘देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंवर करुणा दाखवली, पण ती पुन्हा पुन्हा नाही दाखवणार’, एकनाथ शिंदेंचा सूचक इशारा
सभागृहातही विरोधक आणि सत्ताधाटी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. धनंजय मुंडेंनी एकनाथ शिंदेंना ऐकनाथ होऊ नका, असा टोलाही लगावला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही धनंजय मुंडेंना सूचक इशारा दिलाय.
मुंबई : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session) सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार धुमश्चक्री पाहायला मिळतेय. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहेत. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणा दिल्या. त्यात ‘गद्दारांची भाकरी, भाजपची चाकरी’, ‘खाऊन खाऊन पन्नास खोके, माजलेत गद्दारांचे बोके, गद्दारांचे बोके’, अशा घोषणांचाही समावेश होता. इतकंच नाही तर सभागृहातही विरोधक आणि सत्ताधाटी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) एकनाथ शिंदेंना ऐकनाथ होऊ नका, असा टोलाही लगावला. त्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही धनंजय मुंडेंना सूचक इशारा दिलाय.
धनंजय मुंडेंना सूचक इशारा देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, परवा धनंजय मुंडे मोठ-मोठ्याने ओरडत होते. चलो गुवाहाटी… चलो गुवाहाटी… अगदी बेंबीच्या देठापासून ओरडत होते. जणू काही ते खूप वर्षापासूनचे शिवसैनिक आहेत. आता त्यांच्याबद्दल काय बोलावं. तुमचा सगळा प्रवास मला माहिती आहे. आम्हाला सगळं माहितीय. देवेंद्र फडणवीसांनी तुमच्यावर प्रेम, दया, करुणा दाखवली. पण परत परत ती दाखवता येणार नाही, असा टोला शिंदे यांनी धनंजय मुंडेंना लगावलाय. शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर मात्र सभागृहात मोठा हशा पिकला.
थेट जनतेतून सरपंच, नगराध्यक्ष निवडीवरुन अजितदादा संतापले
प्रत्यक्ष जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय हा लोकशाहीसाठी अत्यंत घातकी आहे. यामुळे स्थानिक पातळीवर मनी, मसल पॉवर असणाऱ्यांचे वर्चस्व निर्माण होऊ शकते. गरीब आणि सामान्य कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी मिळणार नाही. थेट जनतेतून निवडून आलेला नगराध्यक्ष एका विचाराचा तर उर्वरीत बहुसंख्य सदस्य दुसऱ्या विचाराचे असल्यास शहरांच्या विकासाला खीळ बसते. जनतेतून नगराध्यक्ष निवडीचा आग्रह धरत असाल तर मुख्यमंत्रीसुध्दा थेट जनतेतूनच निवडून द्या, असा टोला अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावलाय.
मुख्यमंत्र्यांचं अजितदादांना उत्तर
थेट सरपंच निवडीवरून विरोधत टीका करत आहेत. घोडेबाजार होईल, असं म्हणत आहे. पण मतांचा घोडेबाजार फक्त एका वॉर्डात होऊ शकतो, पण संपूर्ण शहरात होणार नाही. तसेच जनतेच्या मतानुसारच आम्ही निर्णय घेतो, जनता जे बोलणार तेच आम्ही करणार, असं उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजितदादांना दिलं.