‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट’ शिंदे-मोदी भेटीवरुन प्रवीण दरेकरांनी अंबादास दानवेंना असं का सुनावलं?
Eknath Shinde meet Narendra Modi News : केंद्र सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या काळात सहकार्य केलं नाही. आता मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना वेदांता प्रकल्पाबाबत प्रश्न करावा, असं आवाहनही केलं. तसंच शिंदे-फडणवीस हे सरकार स्थगिती सरकार असल्याचा आरोपही त्यांनी केला. ते टीव्ही 9 मराठीसोबत फोन लाईनवरुन बोलत होते.
मुंबई : आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट अशा शब्दांत प्रवीण दरेकरांनी अंबादास दावनेंना टोला लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर बोलताना दरेकरांनी हे वक्तव्य केलं. एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री उशिरा गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. यावेळी 20 मिनिटं शाह आणि शिंदे यांच्यात चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, काल शाह यांची भेट घेतल्यानंतर शिंदे मोदींची आज भेट घेणार आहेत.
मोदींसोबतच्या भेटीदरम्यान वेदांता प्रकल्पासोबत राज्यातील अनेक प्रलंबित प्रकल्पांबाबत, राज्यातील विकास कामं, राज्यातील प्रश्न यांना मार्गी लावण्यासाठी ही चर्चा होण्याची शक्यता आहे, असं भाजपचे नेते आणि आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केला आहे. यावेळी बोलताना प्रवीण दरेकरांनी महाविकास आघाडीवर टीका देखील केली.
गेली दोन अडीच वर्ष सत्तेत असताना महाविकास आघाडी सरकार झोपलेलं होतं, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली. दरम्यान, सरकार हे आता जनतेच्या संपर्कात आहेत. राज्यातून गेलेल्या वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टरच्या प्रकल्पानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि नरेंद्र मोदी यांच्यात होणारी भेट ही महत्त्वाची मानली जातेय.
पाहा व्हिडीओ :
शिंदे-फडणवीस सरकार हे विकासाची कामं करत आहेत, असा विश्वासही दरेकर यांनी बोलून दाखवला. दरम्यान, प्रवीण दरेकर यांना विरोधी परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सवाल केलाय. केंद्र सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या काळात सहकार्य केलं नाही. आता मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना वेदांता प्रकल्पाबाबत प्रश्न करावा, असं आवाहनही केलं. तसंच शिंदे-फडणवीस हे सरकार स्थगिती सरकार असल्याचा आरोपही त्यांनी केला. ते टीव्ही 9 मराठीसोबत फोन लाईनवरुन बोलत होते.
अंबादास दानवे यांनी केलेल्या टीकेला प्रवीण दरेकर यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ‘आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट’ असं म्हणत प्रवीण दरेकर यांनी अंबादास दानवे यांना टोला लगावलाय. महाविकास आघाडी सरकारने किती कामांना स्थगिती दिली होती, त्याचाही हिशोब द्यावा, असंही दरेकर यांनी म्हटलंय.
सोबतच शिंदे-फडणवीसांना सहा महिन्यांचा वेळ द्यावा, त्यानंतर आम्ही लेखाजोखा मांडू. त्यावर मग विरोधकांनी बोलावं, असं आवाहनही प्रवीण दरेकर यांनी केलं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग्यप्रकारे सरकार चालवत असल्याचा विश्वासही दरेकरांनी बोलून दाखवला.