Eknath Shinde : एकनाथ शिंदे दिल्लीत येताच चर्चांना उधाण; भाजप नेते, वकील आणि निवडणूक आयोगालाही भेटणार?
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संसदेत जाणार आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर निवडणूक आयोगाशी चर्चा करणार आहेत.
नवी दिल्ली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) आज दिल्लीत दाखल झाले आहेत. शिंदे दिल्लीत येताच चर्चांना उधाण आलं आहे. त्याला कारणही तसंच आहे. शिवसेनेतील 12 खासदारांनी बंड केलं आहे. त्यामुळे शिंदे यांची दिल्ली भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. शिंदे आज या 12 खासदारांची भेट घेऊन त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांना भेटणार असल्याचं सांगितलं जात आहे. भाजपचे (bjp) ज्येष्ठ नेते, वकील आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनाही शिंदे आज भेटणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे शिंदे यांच्या या दिल्लीवारीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिंदे आज खासदारांसोबत पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. यावेळी बंडखोर खासदार आपल्या भावना व्यक्त करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संसदेत जाणार आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर निवडणूक आयोगाशी चर्चा करणार आहेत. यात शिंदे निवडणूक आयोगाची भेट घेणार असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. पक्षावर दावा करण्यासाठीची प्रोसेज समजून घेण्यासाठी तर शिंदे निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाणार नाहीत ना? अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे. त्यामुळे शिंदे यांच्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या भेटीकडे आणि त्यानंतर होणाऱ्या राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
वकिलांना भेटणार
या भेटीत शिंदे दिल्लीत काही ज्येष्ठ वकिलांची भेट घेणार आहेत. उद्या घटनापीठापुढे बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्या संदर्भात शिंदे वकिलांशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच ओबीसी आरक्षणावरही ते वकिलांशी चर्चा करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
खासदार खदखद व्यक्त करणार
त्यानंतर शिंदे दुपारी 12 खासदारांसोबत 2 ते 3 वाजेच्या दरम्यान महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी शिवसेनेचे हे बाराही खासदार मनातील खदखद बोलून दाखवणार आहेत. शिवसेना सोडण्याची कारणेही हे आमदार सांगणार आहेत. त्यामुळे त्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. काल रात्री उशिरा दिल्लीतील ऐरोसिटी इथल्या एका पंचतारांकीत हॉटेलात रात्री 3 वाजेपर्यंत शिंदे यांची बैठक सुरू होती. या बैठकीला कोण कोण उपस्थित होते आणि काय चर्चा झाली? हे गुलदस्त्यात आहे. मात्र, सकाळीच 12 खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे वेगळा गट स्थापन करण्याचं पत्रं दिल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.