अमित शाहांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लालबागच्या दर्शनाला जाणार नाहीत! अचानक माघार घेण्याचं कारण काय?
Ekanth Shinde News : एकनाथ शिंदे यांनी लालबागच्या राजाच्या दर्शनाला अमित शाह यांच्यासोबत न जाण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आधी नियोजित असलेल्या कार्यक्रमानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अमित शाह यांच्यासोबत लालबागचा राजा येथे बाप्पाच्या दर्शनाला जाणार, असं ठरलेलं होतं.
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah in Mumbai) आज मुंबईत लालबागच्या राजाच्या (Lalbaug cha Raja) दर्शनाला जाणार आहेत. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही (CM Ekanth Shinde) तिथे जाणार होते. पण आता एकनाथ शिंदे यांनी लालबागच्या राजाच्या दर्शनाला अमित शाह यांच्यासोबत न जाण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आधी नियोजित असलेल्या कार्यक्रमानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अमित शाह यांच्यासोबत लालबागचा राजा येथे बाप्पाच्या दर्शनाला जाणार, असं ठरलेलं होतं. पण अचानक एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्यासोबत न जाण्याचा निर्णय का घेतला, यावरुन आता तर्क वितर्क लढवले जाऊ लागले आहेत.
कसा आहे आजचा अमित शाह यांचा मुंबई दौरा? : पाहा व्हिडीओ
शिंदेचा अचानक निर्णय का?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक अमित शाह यांच्यासोबत न जाण्याचा निर्णय का घेतला, याबाबतचही माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आधी जारी करण्यात आलेल्या कार्यक्रमांच्या नियोजनात अमित शाह यांच्यासोबतच्या लालबागच्या राजा मंडळाला भेट देण्याचा कार्यक्रमही आखण्यात आला होता. मात्र नंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला असावा, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शाहांबोत आता मुख्यमंत्री लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जाणार नाहीत, हे स्पष्ट झालं आहे.
शिक्षक दिन असल्याने मुख्यमंत्री हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. दुपारी साडेतीन वाजल्यानंतर ते गणेशोत्सवानिमित्त काही ठिकाणांना भेटी देणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. मात्र या सर्व कार्यक्रमांच्या नियोजनात अमित शाह यांच्यासोबत आता कोणताही कार्यक्रम नसल्यानं चर्चांना उधाण आलंय.
पाहा LIVE घडामोडी..
अमित शाह हे रविवारी रात्री मुंबईत दाखल झाले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर हजर होते. त्यानंतर आता आज अमित शाह हे आधी लालबागच्या राजाला भेट देतील. त्यानंतर भाजपच्या कोअर कमिटीसोबत ते बैठक घेणार आहेत. या बैठकीत महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने रणनिती ठरवली जाण्याची शक्यता आहे. तसंच यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या घरच्या गणपतीलाही शाह भेट देण्याची शक्यताय.