शिलेदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या पुन्हा गुवाहटीत!! वाचा दौऱ्याचे Updates!
एकनाथ शिंदे आणि सर्व आमदार-खासदार सहा महिन्यांपूर्वी जिथे थांबले होते, त्याच हॉटेल रेडिसन ब्लू येथे त्यांचा उद्याचा मुक्काम असेल.
मुंबईः ज्या गुवाहटीत (Guwahati) 6 महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातील सत्तांतर (Maharashtra politics) नाट्याचा महाप्रयोग रंगला, त्याच गुवाहटीकडे आज राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. कारण पक्षातील महत्त्वाच्या आमदारांच्या ताफ्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गुवाहटी दौऱ्यावर निघाले आहेत. कारण सांगितलंय, पर्यटन विकासासाठीच्या दौऱ्याचं.
पण महाराष्ट्रात सत्तांतर होण्यासाठीच्या प्रयत्नांना यश येऊ दे, हे साकडं ज्या कामाख्या देवीला घातलं… त्यासाठी जे नवस बोललं, ते फेडण्यासाठीच मुख्यमंत्री शिंदे आपल्या शिलेदारांसह पुन्हा एकदा देवीच्या दर्शनासाठी जात आहेत… कुठे दबक्या तर कुठे स्पष्ट छातीठोकपणे सांगितलं जातंय. उद्या 26 आणि 27 नोव्हेंबरचा हा दौरा आहे. शिंदे यांच्यातर्फे दोन खास विमानं तयार आहेत. उद्या कुठे काय काय घडणार याचे अपडेट्स पुढील प्रमाणे-
- हाती आलेल्या माहितीनुसार, 50 आमदार, 13 खासदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 26 आणि 27 नोव्हेंबर रोजी गुवाहटीला जाणार आहेत.
- शिवसेनेतलं बंड यशस्वी होऊ दे, यासाठी एकनाथ शिंदे यांनी नवस बोललं होतं, तेच पूर्ण करण्यासाठी हा ताफा कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जात असल्याची माहिती, सूत्रांनी दिली आहे.
- एकनाथ शिंदे आणि सर्व आमदार-खासदार सहा महिन्यांपूर्वी जिथे थांबले होते, त्याच हॉटेल रेडिसन ब्लू येथे त्यांचा उद्याचा मुक्काम असेल.
- या दौऱ्यासाठी दोन मोठी विमानं बुक करण्यात आली आहेत.
- 26 नोव्हेंबर रोजी सकाळी मुंबईहून हा ताफा निघेल. 26 तारखेलाच उद्या गुवाहटीत कामाख्या देवीच्या मंदिरात विशेष पूजेचं आयोजन कऱण्यात आलं आहे.
- 27 नोव्हेंबर रोजी रात्रीपर्यंत शिलेदारांसह शिंदे पुन्हा मुंबईत पोहोचतील.
- मुख्यमंत्र्यांचा हा दौरा यशस्वी करण्यासाठी आधीच काही खास लोकं गुवाहटीत पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
- या दौऱ्यासाठी सरकारी कारणही देण्यात आलंय. आसमचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांच्यासोबत एक बैठक आयोजित करण्यात आली आहे.
- आसामच्या पर्यटन विकासासाठी ही बैठक आहे. महाराष्ट्र आणि आसाम या दोन राज्यांमध्ये पर्यटनासंबंधी काही सामंजस्य करार करण्यात येतील, असेही सांगण्यात येत आहे.