नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नाराज?
नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडीतील घटकपक्ष नाराज असल्याची माहिती मिळतेय.
मुंबई : काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर राज्यात जोरदार राजकीय हालचाली होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडीतील घटकपक्ष नाराज असल्याची माहिती मिळतेय. खासकरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पटोले यांच्या राजीनाम्याबाबत नापंसती व्यक्त केल्याचं बोललं जात आहे. महाविकास आघाडीचं सरकार स्थिर होत असतानाच त्यांनी राजीनामा देण्याची गरज नव्हती, अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका असल्याची माहिती मिळत आहे.(CM Uddhav Thackeray and Deputy CM Ajit Pawar are upset over the resignation of Nana Patole)
पटोले काय म्हणाले?
नाना पटोले यांनी गुरुवारी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे त्यांनी आपल्या राजीनामा सुपूर्द केलाय. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी आपल्याला राजीनामा देण्यास सांगितल्यामुळे आपण विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, अशी प्रतिक्रिया पटोले यांनी दिली आहे. “पाणी वाहतं राहिलं तर ते स्वच्छ असतं. यापुढे आता पक्ष जी काही जबाबदारी देईल ती जबाबदारी स्वीकारेल आणि त्या जबाबदारीला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करेन. माझ्या पक्षाध्यक्षांनी जो आदेश दिला त्यानुसार मी तुमच्या सगळ्यांसमोर राजीनामा दिला. आता विधानसभेच्या अध्यक्षपदी कोण ते तीनही पक्षांचे हाय कमांड निर्णय घेईल”, असंही पटोले म्हणाले.
सह्याद्री अतिथीगृहावर चर्चा
पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर आता लवकरच त्यांच्या गळ्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडणार असल्याची दाट शक्यता आहे. पण पटोले यांचा राजीनामा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना पटलेला नसल्याचं बोललं जात आहे. सह्याद्री अतिथीगृहावरील मंत्रिमंडळ बैठक पार पडल्यानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सरकारसमोर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मुद्दा समोर येणार आहे.
शरद पवार काय म्हणाले?
शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी ऑफ द रेकॉर्ड गप्पा मारताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. काँग्रेस पक्षांतर्गत दबाव असल्याने अध्यक्ष बदलाचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्ष बदलताना काँग्रेसने आमच्याशी चर्चा केली होती. अध्यक्षपद तिन्ही पक्षाचं असल्याने आता ते खुलं झालं आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष कोण असणार? यावर पुन्हा चर्चा होणार आहे, असं पवारांनी स्पष्ट केलं आहे. पवारांनी अत्यंत मोजक्याच शब्दात पण अत्यंत मुद्देसुद भाष्य केलं आहे. पवारांची ही तीन वाक्ये काट्यासारखी टोकदार असल्याने त्याने आघाडीतल कोणता पक्ष घायाळ होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या :
पवारांचे फक्त तीन वाक्य आणि ठाकरे सरकारमध्ये पूर्ण उलथापालथीचे संकेत?; वाचा सविस्तर
CM Uddhav Thackeray and Deputy CM Ajit Pawar are upset over the resignation of Nana Patole